पुणे

कोपर्डे हवेली : पारायण सोहळ्यात ओटी भरुन लेकींचा होणार सन्मान

CD

सासरी हळवा निरोप, माहेरवाशिणी भारावल्या

कोपर्डे हवेलीत पारायण सोहळ्यात ओटी भरून होणार लेकींचा सन्मान

जयंत पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोपर्डे हवेली, ता. १७ : सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीच्या मनात माहेरची ओढ कधीच मिटत नाही. सण- उत्सव, यात्रा किंवा कौटुंबिक आनंदाच्या क्षणी डोळे भरून येतात आणि मन म्हणते, ‘‘माहेरच्या वाटेवर पुन्हा पुन्हा पाय ठेवूया...’’
आता कोपर्डे हवेली गावातून एक असा भावनिक निरोप पोहोचलाय, की प्रत्येक माहेरवाशीणीचे डोळे पाणावले आहेत. माहेरच्या माणसांनीच हात जोडून निरोप धाडलाय ‘लेकींनो माहेरी या साडी-चोळीने तुमची ओटी भरायची आहे, आम्ही सर्वजण तुमची वाट पाहतोय.’ गेल्या ५० वर्षांपासून संत नामदेव मंडळ अखंड श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करत आहे. यंदा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती महोत्सवानिमित्त गावातील सर्व माहेरवाशिणींना विशेष सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सोहळ्यात प्रत्येक माहेरवाशिणीला साडी- चोळी देऊन, ओटी भरून, मायेच्या कुशीत घेऊन सन्मानित केले जाणार आहे. हा भावपूर्ण कार्यक्रम उद्या (रविवार) दुपारी एक वाजता होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तयारी जोरात सुरू असून, गावकऱ्यांनी आंतरदेशी पत्राद्वारे घराघरांत जाऊन तीन हजारांहून अधिक पत्रे वाटली आहेत. या पत्रात फक्त आमंत्रण नाही, तर मायेची ओढ, प्रेम आणि आपलेपणा आहे.
‘माहेरचा हा प्रेमळ निरोप आहे. माहेरी यायलाच लागतंय.’ संत नामदेव मंडळ सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवते, ज्यात स्वातंत्र्यसैनिक सन्मान, शाळेला सहकार्य, कीर्तन सोहळे, ज्ञानेश्वरी-तुकाराम गाथा वाटप, हरिपाठ स्पर्धा आदींचा समावेश आहे; परंतु यंदाचा हा उपक्रम वेगळा आहे; कारण तो फक्त सन्मान नाही, तर माहेरच्या मायेचा हळवा स्पर्श आहे.
माहेरवाशिणींनो तुमच्या पावलांची वाट पाहतंय कोपर्डे हवेली, या आणि पुन्हा एकदा मायेच्या कुशीत डोकं ठेवा. कारण माहेर म्हणजे शुद्ध प्रेम आहे, जे कधी संपत नाही. माहेरची ही ओढ माहेरचा हा प्रेमळ निरोप नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल, असं पत्रात नमूद केले आहे.
----------------------------
कोट :

लग्नाला कितीही वर्षे झाली, तरी नांदायला गेलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक मुलीला माहेरची ओढ ही असतेच. कोपर्डे हवेलीत होणाऱ्या पारायण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असा निरोप पत्राद्वारे मिळाला आणि मन भरून आलं. पत्रामध्ये मायेची ऊब अनुभवायला मिळाली.

- पद्मा विजय पाटील, चिखली
----------------------------------
चौकट :

पत्राद्वारे निरोप

दरवर्षी पारायण सोहळ्याचे भव्य असे आयोजन केले जाते. यावर्षी थोडासा वेगळा उपक्रम घेतला आहे. गावातील लग्न होऊन सासरी गेलेल्या सर्व लेकींची साडी-चोळीने ओटी भरून सन्मान केला जाणार आहे. गावात घरटी जाऊन आंतरदेशीय पत्राद्वारे निरोप दिला आहे. जवळपास तीन हजारांहून अधिक पत्र दिली आहेत. तरीही नजरचुकीने एखाद्या लेकीला निरोप पोहोचला नसेल, त्यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहावे, आम्ही तुमची वाट बघतोय, असे आवाहन पारायण सोहळा आयोजक व कोपर्डे हवेली ग्रामस्थांनी केले आहे.
-----------------------------------
फोटो : पद्मा विजय पाटील, चिखली

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये जमण्याचे आदेश? मुंबईत चाललंय काय? फडणवीसांनी दिलं उत्तर

Navneet Rana : ''बाळासाहेबांनी स्वत:च्या मुलाला शाप दिला''; मुंबईच्या निकालावरून नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

Malegaon Municipal Election : मालेगावचे 'किंग' दादा भुसे! शिवसेनेची ऐतिहासिक मुसंडी, भाजप-काँग्रेसचा धुव्वा

PF Withdrawal via UPI : ‘पीएफ’ खातेधारकांसाठी खुशखबर!, ‘UPI’ द्वारे पैसे काढण्याची तारीख आली समोर

IND vs NZ: जडेजाच्या फॉर्मची भारतीय संघात चिंता? मोहम्मद सिराजने सांगितले कसे आहे टीममधील वातावरण

SCROLL FOR NEXT