कोथरूड, ता. २ ः कोथरूड डेपो परिसरात प्रस्तावित उड्डाण पूल करण्यापूर्वी परिसरातील अतिक्रमणे हटवणे, रस्ता रुंदीकरण करून ४२ मीटर रुंदीचा रस्ता तसेच पदपथ व सायकल मार्ग बनवणे आवश्यक आहे. ही कामे न झाल्यास भविष्यात या भागातील वाहतूक कोंडी वाढून त्याचा त्रास होण्याची शक्यता नागरिकांनी बैठकीत उपस्थित केली.
उड्डाण पुलाच्या नियोजनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या शंका आणि सूचना जाणून घेण्यासाठी कोथरूड सिटिझन फोरमच्या वतीने वेस्ट एंड व्हिलेज सोसायटीमध्ये बैठक घेण्यात आली. प्रशांत कनोजिया म्हणाले, ‘‘मेट्रो, उड्डाण पूल आम्हाला हवा आहे. मात्र पुढील २५ वर्षांतील लोकसंख्या, वाहनसंख्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्थानके, जोड रस्ते यांचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन व्हावे. पूल बांधल्यावर पुन्हा तोडण्याची वेळ येऊ नये. नागरिकांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या सूचनांचा विचार न करता घाईघाईने प्रकल्पाची सुरुवात करू नये, नागरिकांची मते, हरकती आणि सूचना जाणून घेण्यासाठी जनसुनावणी घ्यावी.’’
आर्किटेक्ट मिलिंद किर्दत म्हणाले, ‘‘अशी कामे दीर्घकालीन वापर लक्षात घेऊन करायची असतात. वनाज मेट्रो स्थानकाच्या वर असलेल्या रिकाम्या मजल्यावर दुचाकी वाहनतळ करता येऊ शकतो.’’
या बैठकीचे आयोजन कनोजिया, नीलेश सेंदाने, अमित बोत्रे, विशाल अट्टल आणि राहुल चव्हाण यांनी केले होते.
बैठकीत आलेले मुद्दे
- पौड रस्त्यावर कचरा डेपोजवळ रस्ता ४२ मीटर रुंद आहे; मात्र चांदणी चौकाकडे येताना तो ३६ मीटर
- लोहिया जैनसमोर तो पुन्हा रुंद होतो. उड्डाण पुलाला वर उचलण्यासाठी दोन भाग असतात. एक पूर्ण भर घालून केलेला बंद भाग- जिथे उभी भिंत घातल्यामुळे रस्ता अरुंद होतो आणि दुसरा खाबांवर वरती उचललेला भाग- ज्याच्या खाली रस्त्याला रुंदी देता येते.
- महाराजा कॉम्प्लेक्ससमोर असलेले आधीचे खांब पुन्हा वापरता यावेत, या कारणास्तव उड्डाण पुलाचे तिथले टोक हे अरुंद भागातच आहे, तर चांदणी चौकाच्या बाजूचे टोक हे सेव्हन-इलेव्हन हॉटेलजवळ आहे. त्यामुळे कोंडी होणारच आहे.
- उड्डाणपूल फक्त ९०० मीटरचा आहे. वनाजकडून आलेल्या वाहनांना उड्डाण पूल उतरल्यानंतर लोहिया जैनचा सिग्नल लागेल, तसेच चांदणी चौकाकडून वनाजकडे जाणाऱ्या वाहतुकीलासुद्धा लोहिया जैनचा सिग्नल टाळता येणार नाही.
- प्रत्येक मेट्रो स्थानकावर वाहनतळ आवश्यक आहे. वाहनातून उतरताना रस्ता अडतो. त्यावेळी मोठी वाहतूक कोंडी होते.
- महाराजा कॉम्प्लेक्स, सिटी हॉस्पिटल या परिसरात रस्ता रुंदीकरण आवश्यक, असे नकाशात स्पष्ट सांगितले आहे.
- अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी उड्डाण पूल आणि संबंधित विषयांचा विचार करून जनसुनावणी घ्यावी.