नारायणगाव, ता. १४ : शेतकऱ्यांची मागणी तसेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डिंभे डावा कालव्याद्वारे मीना व घोड शाखा कालव्यात गुरुवारपासून (ता.१४) अनुक्रमे २०० व १०० क्युसेकने व वडज धरणातून मीना पूरक कालव्यात पाणी सोडले आहे. कुकडी डावा कालव्यात २८ मे पासून पाणी सोडण्याचे नियोजन आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.
पाणीटंचाईच्या काळात कुकडीचे आवर्तन सोडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आवर्तनाबाबत नान्नोर म्हणाले की, कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून २४ फेब्रुवारी ते १६ एप्रिल दरम्यान उन्हाळी पहिले आवर्तन सोडले होते. या आवर्तनात ७.७६ टीएमसी पाण्याचा वापर झाला. कुकडी प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन व पिंपळगाव कालव्याचे आवर्तन सुरू असताना ओढ्याच्या भरावाजवळ कालवा फुटला; त्यामुळे आवर्तन बंद करावे लागले. पिंपळगाव कालवा दुरुस्तीचे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर या कालव्यात पुन्हा आवर्तन सुरू करण्यात येईल. आवर्तनासाठी येडगाव धरणात पिंपळगाव जोगे, डिंभे, माणिकडोह या धरणातील पाण्याचा उपयोग करावा लागणार आहे. नागरिक व शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कुकडी प्रकल्पात ५.२४ टीएमसी (१७.६७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी मोसमी पाऊस लांबणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे कुकडी प्रकल्पात पिण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवावा लागणार आहे. याचा विचार करून नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे.
- गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.