कुर्डुवाडी न्यायालयात २ महिन्यांत सुरू होण्याची शक्यता
१६ पदांना मंजुरी; दवाखान्याच्या नूतन इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात कामकाज
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. ९ : कुर्डुवाडी येथे सुरू होणाऱ्या ‘दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग’ न्यायालयासाठी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने १६ नवीन पदांच्या निर्मितीस मंजुरी दिली आहे. येत्या दोन महिन्यांत न्यायालय सुरू होण्याची शक्यता आहे. कुर्डुवाडीसह माढा तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून, शहरातील बाजारपेठेलाही चालना मिळणार आहे.
पदांबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाज सुरुवातीला शहरातील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजीराजे प्राथमिक शाळा क्रमांक १च्या प्रांगणातील दवाखान्याच्या नूतन इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या कायमस्वरूपी इमारतीसाठी कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यालगत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या १६ एकर जागेपैकी १० एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रांताधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्याधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. कुर्डुवाडी व टेंभुर्णी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागरिक पक्षकारांना आणि विधिज्ञांना कुर्डुवाडीतील न्यायालय सोयीचे ठरणार आहे. कुर्डुवाडी रेल्वे जंक्शन असल्याने या भागातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी येणे सुलभ होणार आहे. त्यामुळे शहरातील छोटे-मोठे व्यवसाय आणि बाजारपेठेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
मंजूर पदे :
नियमित पदे (अस्थायी) - एकूण १२ :
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग : १
सहायक अधीक्षक : १
लघुलेखक (ग्रेड-३) : १
वरिष्ठ लिपिक : २
कनिष्ठ लिपिक : ४
बेलिफ (जामीनदार/शिपाई) : ३
बाह्ययंत्रणेद्वारे (कंत्राटी) सेवा - एकूण ४ :
शिपाई : २
सुरक्षा रक्षक : १
सफाईगार : १