कुर्डुवाडीतील १०२ वर्षांपूर्वीची रेल्वे शाळेची इमारत जमीनदोस्त
९३ वर्ष विद्यार्थी घडवलेली शाळा पाडली; अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी ता. ३ : सुमारे १०२ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली व काही वर्षांपूर्वी बंद झालेली हजारो विद्यार्थ्यांना घडवलेली कुर्डुवाडी येथील मध्य रेल्वे प्रशालेची इमारत पाडण्यात आली आहे.
साधारणपणे सन १९२४ मध्ये पहिली ते चौथीसाठी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर कंपनीने सुरू केलेली ही शाळा दक्षिण मध्य रेल्वे प्रशाला म्हणून ओळखली जायची.
रेल्वेमुळे कुर्डुवाडी शहराच्या विकासात भर पडत गेली. बार्शी लाइट रेल्वेचा प्रारंभ झाला होता. १९४२-५७ मध्ये बार्शी लाइट रेल्वे नावाने शाळा चालली. १९७४ नंतर मध्य रेल्वे प्रशाला झाली. चौथी नंतरच्या वर्गांची गरज भासू लागल्यानंतर १९७५ मध्ये पाचवी सुरू झाली आणि १९७९ मध्ये पहिली दहावीची बॅच झाली.
कुर्डुवाडी हे रेल्वे जंक्शन असल्याने व त्या काळात ब्रॉडगेजबरोबर नॅरोगेज रेल्वे होती. त्यामुळे रेल्वे कर्मचारी संख्या खूप होती. रेल्वे कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे रेल्वे शाळेत विद्यार्थी संख्या भरपूर असायची. २००३ सालानंतर मात्र विद्यार्थी संख्या कमी होत गेली. शिक्षकांची संख्या कमी होत गेली व नवीन शिक्षक भरती करण्यात आली नाही. टप्प्याटप्प्याने वर्ग कमी झाले व २०१९ मध्ये शाळा बंद करण्यात आली. शिक्षक-कर्मचाऱ्यांना इतर विभागात समायोजित करण्यात आले. शाळा बंद होऊ नये म्हणून अनेक नागरिक, माजी विद्यार्थी व संघटनांनी अयशस्वी प्रयत्न केले. शाळा बंद झाल्यानंतरही अनेक माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर घेत आठवणींना उजाळा दिला. इमारतीतील वर्ग खोल्या, ग्रंथालय, कार्यालय अशा सुमारे २४ खोल्या प्रशासनाकडून पाडण्यात आल्या.
कुर्डुवाडीतील एक एक युनिट बंद
कुर्डुवाडी गावाची ओळख रेल्वेमुळेच मिळालेली आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रत्येत युनिट मोठ्या प्रमाणावर सुरी होते. रेल्वे लोको शेड, आरपीएफ सेंटर, रेल्वे शाळा, कॉलनी यामुळे या परिसरातील मोठे अर्थकारणही होते. किंबहुना रेल्वेमुळे कुर्डुवाडीची बाजारपेठ जोमात चालत होती. कालांतराने एक एक युनिट बंद पडत गेल्याने येथील कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होत आहे.
याशाळेने दिले अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू
या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी अभियंते, डॉक्टर्स तर झाले आहेतच शिवाय ॲथलेटिक्स खेळाडू दिले, सुहास दुपारगुडे, महेंद्र जगताप, रीना जानराव, बिंटू लोंढे, विजय खोत रेणुका गगनहळ्ळी या सारखे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू शाळेने दिले आहेत.
फोटो ओळ- कुर्डुवाडी (ता. माढा) : येथील पाडण्यात आलेली रेल्वे प्रशालेची इमारत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.