पुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा राकेश, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे.
उद्या (ता. १०) शनिवारी दुपारी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांचे चिरंजीव राकेश यांनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी सात ते साडेसात दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर मुंबई माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरात ११.३० ते १२.३० पर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. नंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
काही दिवसांपासून लालनताई पुण्यातील जोशी रुग्णालयात उपचार घेत होत्या, तेथेच त्यांनी शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. लालनताईंचा जन्म २६ डिसेंबर १९३८ मध्ये मुंबईत झाला. सिद्धार्थ महाविद्यालयात असताना नाट्यस्पर्धांमधून त्यांनी भाग घेतला होता. तेथूनच त्यांच्यातील कलांतील जाणिवा अंकुरल्या. इथेच त्यांची कमलाकर सारंग यांच्याशी भेट झाली. पुढे त्यांचा विवाह झाला.
चाकोरीबाहेरच्या भूमिका स्वीकारण्याचे धाडस त्यांनी केले. नंतरच्या काळात तेंडुलकरांच्या नाटकांतून प्रमुख भूमिका साकारताना बंडखोर अभिनेत्री अशीच त्यांची ओळख निर्माण झाली. कणकवलीत २००६ मध्ये झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. ‘कमला’, ‘सखाराम बाइंडर’, ‘पुरुष’, ‘गिधाडे’, ‘रथचक्र’, ‘खोल खोल पाणी’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’ अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
‘सखाराम बाइंडर’ नाटकासंदर्भातील संघर्ष, त्यासाठी त्यांनी दोघांनी (कमलाकर आणि लालनताई) दिलेला लढा शब्दबद्ध झाला. सुमारे पाच दशके लालनताई रंगभूमी, चित्रपट आणि छोट्या पडद्यावर वावरल्या. प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण नाट्यानुभव देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. २०१७ मध्ये लालनताईंना नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव देऊन सन्मानित केले होते. गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी- सखी- सचिव सन्मानही त्यांना मिळाला होता.
मी आणि माझ्या भूमिका, जगले अशी, बहारदार किस्से, चटकदार पाककृती, नाटकांमधील नाट्य या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. सामना, हा खेळ सावल्यांचा... या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘रथचक्र’ या हिंदी मालिकेत त्यांनी भूमिका वठविली होती. तसेच, ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, ‘उद्याचा संसार’, ‘बेबी’, ‘कालचक्र’, ‘घरटे अपुले छान’ या नाटकांतील त्यांच्या भूमिकाही रसिकांच्या स्मरणात राहिल्या. पुण्यात त्यांनी सुरू केलेले मासेमारी हे हॉटेल खवय्ये पुणेकरांसाठीचे विशेष आकर्षण ठरले होते.
लालन सारंग यांचा अल्पपरिचय
- मराठी रंगभूमीवरील बंडखोर आणि तडफदार अभिनेत्री अशी ओळख.
- निर्माती, गृहिणी, पाककृती कुशल व लेखिका म्हणूनही ओळख.
- हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेतील नाटक-चित्रपटांमध्ये अभिनय.
- दहावीनंतर टायपिंगचा कोर्स पूर्ण करून त्यांनी घड्याळ्याच्या दुकानात नोकरी केली.
- उमेदीच्या काळात कामगार आयुक्तालयात टायपिस्टची नोकरी केली.
- १९६४ मध्ये त्यांचे नाट्यदिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्याशी लग्न झाले.
- १९६८ मध्ये त्यांनी कुटुंबासाठी नोकरी सोडली.
- लग्नानंतर अभिनय कारर्किदीला सुरवात.
- कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केलेल्या काही नाटकांत सुरवातीला छोट्या भूमिका.
- सत्यदेव दुबे यांच्या स्टील फ्रेम चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळे अभिनेत्री म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
- ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित, ‘सखाराम बाइंडर’ नाटकातील ‘चंपा’च्या भूमिकेने इतिहास घडवला.
- सारंग दाम्पत्याने अभिषेक आणि कलारंग संस्थांची स्थापना केली.
- ‘जगले जशी’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासह, ‘माझं स्वयंपाक घर’, ‘नाटकांमागील नाट्य’, ‘मी आणि माझ्या भूमिका’, ‘बहारदार किस्से चटकदार पाककृती’ ही त्यांची पुस्तके.
- ‘सूर्यास्त’, ‘रथचक्र’,‘कमला’,‘जंगली कबूतर’,‘घरटे आपुले छान’,‘बेबी’,‘कालचक्र’,‘खोल खोल पाणी’ या नाटकांतील भूमिका गाजल्या.
- ‘सामना’, ‘मेहेक’,‘हा खेळ सावल्यांचा’ अशा काही चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या.
- २०१२ मध्ये जयवंत दळवी लिखित ‘कालचक्र’ या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.