‘ती’ जमीन मोदींच्या बालमित्राला केली परत
पंतप्रधानांकडे तक्रारीनंतर आमदार नरेंद्र मेहता बॅकफुटवर
ठाणे, ता. १६ : भाईंदरमधील आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित जमिनीचा वाद थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचला. या प्रकरणातील तक्रारदार असगर अली वोरा हे पंतप्रधान मोदी यांचे बालपणीचे मित्र असल्याचे सांगण्यात येते. वोरा यांनी पंतप्रधानांकडे तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स कंपनीने वादग्रस्त जमीन व्यवहारातून माघार घेतली .
भाईंदर येथील रहिवासी असगर अली वोरा यांनी १९८९ मध्ये भाईंदर (पूर्व) येथील २,८१० चौ.मी. जागा नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केली होती. असे असताना २०११च्या सुमारास जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून सातबारा उताऱ्यावरून त्यांचे नाव कमी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या तक्रारीनंतर २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाला; मात्र या प्रकरणाचा सीआयडी अहवाल ११ वर्षांनंतर प्राप्त झाला. दरम्यान, वोरा यांना माहिती न देता जमिनीचे दोन भाग करण्यात आले. त्यातील एका भागावर स्वयम बिल्डर्स, तर दुसऱ्या भागावर मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स कंपनीचा कब्जा दाखवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. वोरा यांची बाजू न ऐकता २०२५ मध्ये त्यांच्यावरच जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रकरणात हालचाली सुरू झाल्या.
मोदींचे बालपणीचे मित्र?
असगर अली वोरा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपणीचे मित्र असल्याचे सांगण्यात येते. असगर अली वोरा यांनी गुजरातमधील वडनगर येथील बी. एन. हायस्कूलमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिक्षण घेतल्याचा दावा केला आहे. महसूल कार्यालय, मीरा-भाईंदर महापालिका आणि पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेत तक्रार केली. मंगळवारी (ता. ८) त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भाईंदरमधील जमिनीच्या वादाची माहिती दिली.
-------
गुन्हा मागे घेण्याची विनंती
या हालचालीनंतर सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्सने महापालिकेच्या नगररचना विभागाला पत्र देऊन वादग्रस्त जागेसंदर्भातील बांधकाम परवानगी परत करण्याचे कळविले. तसेच वोरा यांच्याविरोधातील गुन्हा मागे घेण्याची विनंती पोलिस आयुक्तांना केली. मंगळवारी (ता. १६) मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांनी मेहता यांना पाचारण करून या प्रकरणाची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद आणि अनेक तक्रारी झाल्यामुळे खरेदी व्यवहार रद्द केला असून, याबाबत वोरा यांना कळविण्यात आल्याचा खुलासा सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्सकडून करण्यात आला.