महाळुंगे पडवळ, ता. १३ : लौकी-दरेकरवस्ती (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. १३) पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी रवींद्र थोरात यांची दोन वर्षांची कालवड ठार झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
रवींद्र थोरात यांचा घराशेजारीच जनावरांचा गोठा आहे. पहाटे जनावरांचा आवाज ऐकून कामगार योगेश कुमार मार्को यांना जाग आली. त्यांनी गोठ्यात बिबट्याला पाहून आरडाओरड केला. रवींद्र थोरात आणि सनी थोरात यांनी धाव घेतली असता बिबट्याने कालवडीच्या मानेचा चावा घेतल्याचे दिसले. नागरिकांना पाहून बिबट्याने पळ काढला. पशुवैद्यकीय डॉ. अभिजीत कोकरे यांनी जखमी कालवडीवर उपचार केले, मात्र जखम खोल असल्याने तिचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वनरक्षक परमेश्वर कसोळे, वनसेवक जालिंदर थोरात आणि किसन पोखरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, दरेकरवस्ती भागात पथदिव्यांची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“लौकी परिसरातील दरेकरवस्ती, मधलामळा, हाडवळा भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. शेतकरी आणि महिलांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. वनविभागाने या भागाची पाहणी करून तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे,” अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.