तालुकास्तरावर जलद दल कृती समिती
बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून उपाययोजना
खंडाळा, ता. १८ : जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, जावळीसह खंडाळा तालुक्यामध्ये बिबट्यांची वाढती लक्षणीय संख्या पाहता जिल्हास्तरावरही या विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी चार थर्मल ड्रोन कॅमेरे, ६० ट्रॅप कॅमेरे, विविध ठिकाणी २५ पिंजरे, तसेच वन्यजीव उपचार केंद्र व सर्व तालुकास्तरावर जलद दल कृती समिती स्थापना अशी उपाययोजना केल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
वन विभागाने दिलेल्या पत्रकात म्हटले, की गेल्या पाच वर्षांचा विचार करता मानव-वन्यजीव संघर्षाबाबत दोन हजार ९९० प्रकरणे झाली आहेत. एकूण तीन कोटी ९६ लाख रुपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभाग सज्ज आहे. त्यासाठी वन विभागाने खबरदारी घेतली आहे. त्यात प्रामुख्याने वराडे (ता. कऱ्हाड) येथे वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू केले आहे. एकूण ११ तालुक्यांत ११ जलद कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष ग्रामसभा, दवंडी, बैठका, भित्तिपत्रके याद्वारे नागरिकांत जनजागृती केली जात आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी घटना घडू नये, यासाठी नावडी (ता. पाटण) व उंडाळे (कऱ्हाड) येथे एआयद्वारे बिबट्या शाेधण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे.
वन्यप्राणी शोधण्यासाठी चार थर्मल ड्रोन, ६० ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. साखर कारखाना व्यवस्थापक व संचालकांना ऊसतोड मजुरांकडून घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना दिल्या असून, प्रत्यक्ष मजुरांचे वास्तव्याच्या ठिकाणी व ऊसतोडीच्या फडात जाऊनही वनकर्मचारी जनजागृती करत आहेत.
-----
हिंस्र प्राण्यांसाठी उपलब्ध साहित्य
बिबट्या पकडण्याचे पिंजरे (२५)
माकड पकडण्याचे पिंजरे (३)
ट्रॅप कॅमेरे (४०)
थर्मल ड्रोन कॅमेरे शील्ड (२०)
स्मार्ट स्टीक (१२)
----
बिबट्याप्रवण क्षेत्रात ही घ्यावी खबरदारी
१) एकटे न फिरता नेहमी घोळक्याने फिरा.
२) बिबट्या दिसल्यास जोरात ओरडा, खाली वाकू किंवा झोपू नका.
३) रात्री उघड्यावर न झोपता घरात झोपा.
४) रात्रीच्या वेळी महिला, लहान मुलांना एकटे सोडू नका.
५) पशुधन उघड्यावर न बांधता बंदिस्त गोठ्यात बांधावे.
६) रात्रीच्यावेळी शेतास पाणी द्यायचे झाल्यास मोबाईल अथवा रेडिओवर गाणी चालू ठेवा, सहकाऱ्यांसोबत शेतात जाणे आवश्यक आहे.
७) कधीही बिबट्याचा पाठलाग करू नका, अन्यथा घाबरून ताे उलटा हल्ला करू शकतो.
----
काेट
.............
खंडाळा तालुक्यातील अतिट, कान्हवडी, लिंबाचीवाडीसह परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. यासाठी गावागावांत जाऊन जागृती केली जात आहे. कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत किंवा मानवी वस्तीत आढळल्यास तत्काळ वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा.
- मारुती निकम
वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग, खंडाळा
------
बिबट्याचे छायाचित्र वापरावे