जेजुरी, ता. ३० : पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील रेल्वे स्टेशन परिसरातील नागरी वस्तीमध्ये वृत्तपत्र विक्रेते संदीप होते यांच्या घरामागील शेतामध्ये मंगळवारी (ता.३०) सकाळच्या सुमारास नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. भरवस्तीमध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
जेजुरी रेल्वे स्टेशन समोर वृत्तपत्र विक्रेते संदीप होले यांचे घर असून घरामागे त्यांचे शेतामध्ये (गट न.५१) डाळिंब व पेरूची बाग आहे. लगतच नगरसेविका अमिना पानसरे यांची इमारत आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे पानसरे परिवारातील एका महिलेने खिडकीतून पाहिले असता शेतामध्ये बिबट्या वावरताना आढळून आला .त्यांनी तत्काळ होले यांचेसह आजूबाजूच्या रहिवाशांना सावध केले. काही मिनिटातच बिबट्या शेजारील मका पिकाच्या शेतात दिसेनासा झाला. जेजुरी पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे , महसूल विभागाचे मंडलाधिकारी संजय बडदे ,ग्राममहसूल अधिकारी प्रमोद वाघ आदींसह वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. जेजुरी विभागातील वनरक्षक धनंजय देवकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. शेतामध्ये कांदा पीक असून नुकतेच पाणी दिल्याने बिबट्याच्या पायांचे ठसे उमटले असल्याचे दिसून आले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले. कोळविहिरे हद्दीतील किर्लोस्कर कंपनी लगत दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. पुरंदर परिसरातील जयाद्री डोंगररांगेच्या पिंगोरी ,कवडेवाडी परिसरात एकच बिबट्या असून जेजुरी परिसरात आढळलेला तो हाच असावा, असा अंदाज आहे. शहरातील जयाद्री डोंगर रांगेच्या पायथ्याशी बारसुडे नगर परिसरातील नागरिकांनासुद्धा तीन दिवसांपूर्वी बिबट्या दिसून आला होता. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे तसेच रात्रीची गस्त वाढविणार असल्याचे वनरक्षक देवकर यांनी सांगितले.
3536