कर्जमाफीसाठी ६९७ कोटींचा निधी
अहिल्यानगरला पहिल्या टप्प्यात ७२ हजार ५५९ लाभार्थ्यांचा समावेश
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६९७ कोटी ८१ लाख २५ हजार १३९ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. कर्जमाफीच्या निधीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कर्जमुक्तीच्या लाभ वितरणाचा प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६५ हजार ६५६ शेतकरी सभासदांना ६२२ कोटी ७४ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमधील सहा हजार ९०३ शेतकऱ्यांना ७५ कोटी सात लाख २५ हजार १३९ रुपयांचा लाभ मिळाला आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने बँकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.
१.१५ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार ७११ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत एक लाख ३२ हजार ५९१ पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यापैकी एक लाख १५ हजार ६९२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आधार प्रमाणीकरणाच्या संख्येतही अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. प्रमाणीकरणानंतर त्यांच्या कर्जखात्यांवर टप्प्याटप्प्याने लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.
चौकट ----
फार्मर आयडी काढण्याचे आवाहन
जिल्ह्यातील आठ हजार ६३६ शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही. त्यांनी तातडीने फार्मर आयडी काढावा. मयत खातेदारांच्या प्रकरणांत वारसांनी संबंधित विकास संस्था किंवा बँकेकडे वारस नोंद करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.