कर्जमाफीसंदर्भातील संग्रहित फोटो घ्यावा
----------------------
कर्जमाफीच्या याद्यांना विलंब, नवे कर्जवाटपही थांबले
बॅंकांच्या माहितीत त्रुटी; आधार, खाते क्रमांक, रक्कम चुकली, खातीही दुबार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : जिल्ह्यात कर्जमाफीसाठी अंदाजे अडीच लाख शेतकरी पात्र आहेत.मात्र, आतापर्यंत केवळ २६ हजार २७४ शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सात हजार ६८१ पैकी चार हजार ७०० शेतकरी आहेत. कर्जमाफीच्या याद्यांना विलंब होत असल्याने ‘कर्ज थकले, कर्जमाफीस पात्र असूनही लाभ नाही आणि आता पाऊस नसल्याने पैशांची आवश्यकता आहे; पण नव्याने कर्जही मिळत नाही,’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून दोन लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जमाफी जाहीर केली. ३० जूनपर्यंत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे शासनाने सांगितले होते. मात्र, एक-दोन याद्यांनंतर पुढील याद्या अद्याप जिल्ह्यांना मिळालेल्या नाहीत. बॅंकांनी पाठविलेल्या माहितीत काही शेतकऱ्यांचे आधार, बॅंक खाते क्रमांक, रक्कम, तर काहींची खाती दोनदा अपलोड झाली होती. त्यात दुरुस्ती करण्यात आली, तरीही नव्या याद्यांना विलंब लागत आहे.
दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेने १ एप्रिल २०२६ नंतर थकबाकीवरील व्याज न घेण्याचा निर्णय घेतला; पण राष्ट्रीयीकृत बॅंका व्याज घेतील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. कर्जमाफी वेळेत मिळाल्यावर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे; पण विलंबामुळे सध्या शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद आहेत.
-----------------------
‘खरीप’चे कर्जवाटप ५८ टक्केच
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आणि राष्ट्रीयीकृत, व्यापारी व खासगी बॅंकांना यंदाच्या खरीप हंगामात सव्वादोन लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यातील बॅंकांना २८५९ कोटींचे कर्जवाटप करायचे आहे. मात्र, जिल्हा बॅंकेने आतापर्यंत खरीप हंगामाचे ६७ टक्के आणि राष्ट्रीयीकृत, व्यापारी व खासगी बॅंकांनी अवघे ५० टक्के कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंक मात्र कर्जवाटपात अव्वल असून या बॅंकेने उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कर्ज थकबाकीत असल्याने अजूनही जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळालेले नाही.
-----------------------
कोट :
कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची एक यादी आपल्याला प्राप्त झाली असून संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अजून आलेल्या नाहीत. काही दिवसांत शासन स्तरावरून याद्या प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
- मुकुंद पवार, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
-------------------------
जिल्ह्यातील कर्जमाफीची स्थिती
कर्जमाफी अपेक्षित शेतकरी : २.५० लाख
पहिल्या यादीतील शेतकरी : २६,२७४
‘डीसीसी’चे पात्र शेतकरी : ७,६८१
प्रतीक्षेतील शेतकरी : २.२४ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.