विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लंडनला पाठवणार
शरद पवार; ‘रयत’मध्ये कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमात मार्गदर्शन
सातारा, ता. ९ : नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग बदलत आहे. विविध विचार आणि संकल्पना जागतिक पातळीवर रूढ होत असताना या सर्व संकल्पनांना समांतर शैक्षणिक व्यवस्था उभी करण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या वतीने केले जात आहे. आपले विद्यार्थी आणि प्राध्यापकही प्रतिभावंतच असावेत, यासाठी संस्थेतील दहा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लंडनला पाठविण्यात येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही अभ्यास, प्रशिक्षणासाठी एमआयटी, बोस्टन विद्यापीठात संशोधनाची संधी देण्यात येईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज खासदार पवार यांनी कर्मवीर समाधीस अभिवादन केले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप वळसे-पाटील, उपकार्याध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधने, जयश्री चौगुले, सरोज पाटील, महेंद्र लाड, ॲड. रवींद्र पवार, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, आमदार परेश ठाकूर, आमदार चेतन तुपे, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, ॲड. दिलावर मुल्ला, जे. के. बापू जाधव, थोर देणगीदार शकुंतला ठाकूर, कर्मवीर कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी अनेक देणगीदारांनी संस्थेस कोट्यवधी रुपयांची देणगी दिली. खासदार पवार म्हणाले, ‘‘थोर देणगीदारांमुळे ऊर्जा वाढते. जगभरातील नामवंत विद्यापीठाशी समन्वय साधून रयत शिक्षण संस्था प्रगती करणार असून, सर्वांनी त्यास साथ द्यावी.’’ संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयत मासिक, रयत विज्ञान पत्रिका, ॲड. बी. एन. नलावडे यांच्या कर्मवीरांचा सांगाती आत्मचरित्राचे, शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा आदींचे प्रकाशन करण्यात आले. थोर देणगीदार, कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा, यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, रयत मासिकाचे कार्यकारी संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी निवेदन केले. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. बी. एन. पवार यांनी आभार मानले.
.................................................
खासदार पवार म्हणाले
१) कर्मवीर अण्णांच्या आदर्शातूनच संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न
२) आता सव्वाचार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत शिक्षण
३) जगातील विद्यापीठांच्या समन्वयातून ‘रयत’च्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद वाढवण्याचा प्रयत्न
४) कर्मवीर अण्णांच्या त्याग आणि दूरदृष्टीनुसार संस्थेचा विस्तार व्यापकपणे सुरू
५) रयत शिक्षण संस्थेच्या वाढलेल्या उंचीचे श्रेय संस्थेतील सेवकांचे
६) संस्थेला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक धोरणात्मक बदल करून निर्णय होणार
...................................................
PNE26W17834
सातारा : कर्मवीर समाधी परिसरात शनिवारी झालेल्या सभेत बोलताना शरद पवार. त्या वेळी डावीकडून सुप्रिया सुळे, विश्वजित कदम, दिलीप वळसे- पाटील, डॉ. अनिल पाटील, चंद्रकांत दळवी, ॲड. भगीरथ शिंदे, रामशेठ ठाकूर, ॲड. रवींद्र पवार आदी. (उल्हास भिडे ः सकाळ छायाचित्रसेवा)
......................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.