पारगाव, ता. १९ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी-धामणी परिसरातील जिराईत पट्ट्यात यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली, पेरण्याही झाल्या, पण आता पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. मागील दीड-दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी सुरू असल्या तरी पावसाअभावी खरीप पिके कोमेजू लागली आहेत.
तालुक्यातील घोडनदी तसेच डिंभा धरण उजवा व डाव्या कालव्यालगत असलेल्या गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांतील खरीप पिकांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सुरुवातीला झालेल्या काही प्रमाणातील पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन ,मका, तूर, उडीद आणि मूग या खरीप पिकांची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जोरदार पाऊस झाला नाही तर केवळ खरीप हंगामच नव्हे, तर पुढील रब्बी हंगामाचेही गणित बिघडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पिकांसोबतच जनावरांसाठी चारा व पाण्याचीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या तरी डिंभा उजवा कालव्याला पाणी सोडणे गरजेचे आहे. त्यामुळे काही भागातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होऊन शेतीला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील रब्बी हंगामाचा विचार करता जोरदार पाऊस होऊन नाले, ओढे आणि जलस्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा होणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
या भागातील स्थिती बिकट
तालुक्यातील काही बागायत भागांतील शेतीला डिंभा उजवा कालव्याच्या पाण्यामुळे दिलासा मिळत आहे. मात्र, मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी, धामणी,पहाडदरा, शिरदाळे परिसरातील कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. कालव्याच्या पाण्याचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळत नसल्याने पावसाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.
जर पावसाने हजेरी लावलीच नाही तर खरीप कसाबसा हाती लागेल पण उत्पादनात मोठी घट होणार आहे. येणारा रब्बी हंगाम, त्याचबरोबर जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाटबंधारे विभागाने डिंभा उजवा कालव्याला पाणी सोडावे.
- महेंद्र वाळुंज, माजी सरपंच, वाळुंजनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.