बी ग्रेसफुल - स्वप्ना साने
केसांचं सौंदर्य जपा...
लीड
स्वतःसाठी दिवसातली १५ मिनिटं राखीव ठेवावीत. अधून मधून ब्यूटी थेरपिस्टकडे जाऊन छानसा हेअर कट करून यावा आणि हेअर केअर ट्रीटमेंटही विचारून घ्यावी. डाएटकडं लक्षं द्यावं. शरीरात कमतरता असलेल्या बाबींची माहिती करून घ्यावी आणि त्यानुसार आहारात, दिनचर्येत बदल करावा. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सची आवश्यकता असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानं त्याही सुरू कराव्यात.
००००००००००
सुंदर, दाट, सिल्की, काळेभोर, लांबसडक, हेल्दी केस... हे फक्त एखाद्या शाम्पूच्या जाहिरातीत मॉडेलचे बघायला मिळतात. क्वचितच एखाद्या युवतीचे केस खरोखरच तसे दिसतात. हल्ली अशा केसांची आपण फक्त कल्पनाच करू शकतो असं वाटतं. काही वर्षांपूर्वी बायकांना वयाच्या पस्तिशीत किंवा चाळीशीत केसगळतीची किंवा केस पांढरे होण्याची समस्या उद्भवायची. पूर्वी आपल्या आजीचे, पणजीचे केस तर सत्तरी-नव्वदी गाठूनसुद्धा बऱ्यापैकी लांब आणि जाडसर असायचे. पण हल्ली अगदी लहान वयापासूनच केसगळती, केस पांढरे होणं, विरळ होणं ह्या समस्या आढळून येतात. शिक्षण पूर्ण होईपर्यंत अनेक मुलांना समोरून टक्कल पडू लागलेलं असतं आणि मुलींचे जेमतेम खांद्यापर्यंतच्या लांबीचे केस उरलेले असतात.
यामागचं कारण काय असू शकतं?
हेल्दी त्वचेसाठी आणि केसांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे पौष्टिक आहार. वाढत्या वयात शरीराला प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स या सगळ्या पोषकतत्त्वांची गरज असते, नित्य आहारात त्यांचा समावेश असणं आवश्यक असतं.
पण ह्याच वयात जर योग्य आहार घेतला नाही, जंक फूडचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर शरीराला पोषकतत्त्वांची कमतरता भासायला लागते. त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर होतो. घरातला सात्विक आहार घेण्यावर भर द्यायला हवा. बाहेरच्या अन्नामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं.
लहान मुलांमध्ये, टीनएजर्समध्ये चिप्स, बर्गर, पिझ्झा, फ्राइज, कोल्ड ड्रिंक आणि इतरही जंक फूडचं सेवन वाढलेलं आहे. पॅकेज्ड फूडचं प्रमाण वाढलं आहे. याचं सेवन करून शरीराला शून्य पोषण मिळतं. उलट, केस गळणं, विरळ होत जाणं, केसांची चमक जाणं, त्वचा निस्तेज होणं या समस्या वाढायला लागतात. म्हणून लहानपणापासून खाण्याच्या सवयी हेल्दी असाव्यात. एखादवेळी बाहेरचं खाल्लं तर हरकत नाही, पण रोज सेवन केल्यानं नुकसानच होणार.
दुसरं कारण असं, की केसांवर भरपूर प्रयोग करायची तरुणाईला उत्सुकता असते. हेअर कलर करणं, हायलाइट्स करणं, हीट ट्रीटमेंट देऊन केसांचं टेक्स्चर बदलणं, सारखं हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरणं, वेगवेगळे स्ट्राँग शाम्पू आणि कंडिशनर वापरणं असे बरेच प्रयोग करायला अनेकांना आवडतं. काही वेळा याचे दुष्परिणाम लगेच दिसतात, तर काही वेळा कालांतरानं दिसू लागतात. हेअरफॉल सुरू होतो, केस भुरकट आणि रफ जाणवायला लागतात.
हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरावेत, पण अगदी गरज असेल त्याचवेळी, रोज नव्हे. काही ओकेजन असल्यास हरकत नाही, पण हीट ट्रीटमेंट घेतल्यानंतर तज्ज्ञांकडून डीप हायड्रेशन थेरपी किंवा हेअर स्पा जरूर करून घ्यावा. तसंच वारंवार शाम्पू बदलणं, नवनवीन प्रॉडक्ट्सचा वापर करणं, कधी हेअर मास्क लावणं, कधी एखादं सिरम वापरून बघणं, कधी कंडिशनर लावणं तर कधी आणखी काही असं केल्यामुळे केस खराब होतात. आपल्या केसांना काय सूट होतं त्याचा अभ्यास करावा आणि त्यानुसार केसांची काळजी घ्यावी.
मध्यमवयीन स्त्रियांनी केसांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. करिअर, लग्न, मुलं मग मुलांचं करिअर या चक्रात तुमच्या आमच्यासारख्या अनेकजणी अडकलेल्या असतात. चाळिशीनंतर जरा वेळ मिळाला, की मग स्वतःकडे लक्ष दिलं जातं. त्यावेळी आरशात निरखून पाहिल्यावर विरळ, भुरकट आणि रुक्ष झालेले केस, निस्तेज त्वचा, हलक्या सुरकुत्या हे सगळं दिसतं आणि मग निराशा येते. इतकी वर्षं स्वतःकडे दुर्लक्ष केल्याची खंत वाटायला लागते. मग निराश न होता स्वतःसाठी दिवसातली १५ मिनिटं राखीव ठेवायची, हे मनाशी पक्क करून टाकायचं. ब्यूटी थेरपिस्टकडे जाऊन छानसा हेअर कट करून यावा आणि हेअर केअर ट्रीटमेंटही विचारून घ्यावी. डाएटकडं लक्षं द्यावं. शरीरात कमतरता असलेल्या बाबींची माहिती करून घ्यावी आणि त्यानुसार आहारात, दिनचर्येत बदल करावा. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सची आवश्यकता असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानं त्याही सुरू कराव्यात.
स्किन केअरइतकंच हेअर केअरही आवश्यक आहे. त्यासाठी काही टिप्स फॉलो करता येतील.
- केसांना ऑइल मसाज करावा. केस रुक्ष असोत किंवा तेलकट असोत, केसांच्या मुळांशी मसाज केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि केसांना पोषण मिळतं.
- खोबऱ्याचं तेल, एरंडेल तेल आणि बदाम तेल सम प्रमाणात मिक्स करून लावावं. कोंडा असेल तर त्यात काही थेंब टी ट्री ऑइल टाकावं. तेलात थोडा कापूर चुरून टाकावा, फायदा होईल.
- केस धुण्यासाठी माइल्ड शाम्पू वापरावा. केसांच्या टेक्सचरनुसार कंडिशनर वापरावं. ३-४ महिन्यातून केस ट्रिम करावेत, त्यामुळे केस हेल्दी दिसतात.
- महिन्यातून एकदा हेअर स्पा करून घ्यावा. आवश्यक असल्यास हेअर ट्रीटमेंटही घ्यावी.
केस डॅमेज झाल्यावर कधी पूर्ववत होतील, होतील की नाही याची शाश्वती नसली, तरी नियमित काळजी घेतल्यास केसांमध्ये सुधारणा होऊ शकते. केसांवर कुठलेही प्रयोग करण्याआधी त्याबद्दल माहिती करून घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.
०००००००००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.