‘पॅट’च्या नियोजनातच अध्ययनाचाच खोळंबा
---
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चर्चेत; नियोजनासह अध्ययनावर परिणाम
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १ : विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व शिकवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेलाच परीक्षा वेळापत्रकाच्या नियोजनाचा विसर पडला आहे का, असा प्रश्न ‘नियत कालिक मूल्यमापन चाचणी’ अर्थात ‘पिरियॉडिक असेसमेंट टेस्ट’च्या (पॅट) वेळापत्रकातील बदलामुळे उपस्थित होत आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या परीक्षेचे वेळापत्रक बदलल्याने शिक्षकांचे नियोजन, नियमित अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या लयीवर परिणाम होण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रथम सत्राच्या परीक्षा, दिवाळीची सुटी आणि अभ्यासक्रमाचा विचार करूनच ‘पॅट’च्या वेळापत्रकातील बदलाचा निर्णय घेतला होता का, याबाबतही शिक्षण क्षेत्रातून प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या केवळ गुणांची नोंद करणे हा तिचा उद्देश नसून, अध्ययनातील अडचणी ओळखून त्यानुसार उपचारात्मक अध्यापन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक आणि त्यानंतरच्या शैक्षणिक प्रक्रियेचे नियोजन महत्त्वाचे ठरते. केंद्र सरकारच्या ‘समग्र शिक्षा’ आणि जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात येणाऱ्या ‘स्टार्स’ प्रकल्पाअंतर्गत शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला होणारी पायाभूत चाचणी यंदा घेण्यात आली नाही. त्यातच प्रथम सत्राच्या अखेरीस होणाऱ्या ‘संकलित मूल्यमापन चाचणी-१’चे वेळापत्रक बदलले. ही परीक्षा आता दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून, ‘संकलित मूल्यमापन चाचणी-२’ एप्रिल २०२७ मध्ये नियोजित आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होऊन शाळांची गुणवत्ता ढासळेल, अशी भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसह शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
---
शिक्षकांवर दुहेरी जबाबदारीचा भार
नवीन पाठ्यपुस्तकांनुसार अध्यापन, अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांचा सराव आणि अध्ययनातील अडचणी दूर करणे, अशी आव्हाने शिक्षकांसमोर आहेत. त्यात जनगणना, मतदारयादी फेरपडताळणी आणि अन्य प्रशासकीय कामांची भर पडली आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने मूल्यमापन, गुणनोंदणी आणि निष्पत्तींच्या विश्लेषणाचेही नियोजन आता बदलावे लागणार आहे.
---
दिवाळी सुटीनंतर लगेच परीक्षेचा दबाव
दिवाळीच्या सुटीनंतर लगेच परीक्षेचा दबाव निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. पॅटचे वेळापत्रक शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच निश्चित करून ते वार्षिक शालेय दिनदर्शिकेशी जोडले पाहिजे. अपरिहार्य कारणांमुळे बदल करावा लागल्यास शाळांना पूर्वसूचना आणि नियोजनासाठी पुरेसा अवधी देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडून वेळेची शिस्त अपेक्षित करताना शिक्षण व्यवस्थेनेही नियोजन आणि अंमलबजावणीत सातत्य राखले, तरच या परीक्षेचा मूळ शैक्षणिक हेतू साध्य होईल.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.