विस्तार संचालक निवडीबाबत
पुन्हा गोंधळाची स्थिती
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : संचालकपदासाठी कृषी विभागाकडे अद्यापही पात्रताधारक अधिकारी नसल्यामुळे राज्याला पूर्णवेळ विस्तार संचालक किमान वर्षभर तरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विस्तार संचालकपदावरून ३१ ऑगस्टला रफिक नाईकवाडी निवृत्त झाल्यापासून विस्तार विभागाला पूर्णवेळ संचालक मिळालेला नाही. स्मार्ट प्रकल्पातील कृषी सहसंचालक उदय देशमुख यांना विस्तार संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. मात्र ३१ ऑक्टोबरला ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता पुढचा विस्तार संचालक कोण, याविषयी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
सध्या अनेक संचालकपदांची अतिरिक्त जबाबदारी सहसंचालकांना देण्यात आली आहे. जीवन बुंदे यांना फलोत्पादन विभाग, तर गणेश घोरपडे यांच्याकडे बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे काम देण्यात आले आहे.
संचालकपदावर पूर्णवेळ नियुक्तीसाठी संबंधित अधिकाऱ्याला सहसंचालक म्हणून किमान तीन वर्षे सेवेचा अनुभव बंधनकारक आहे. मात्र, राज्यातील एकाही सहसंचालकाकडे ऑक्टोबर २०२७ पर्यंत तीन वर्षांचा सेवेचा अनुभव नसेल. त्यामुळे विस्तार संचालकाच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पुन्हा तात्पुरता अधिकारी नेमणे हाच पर्याय शासनाकडे आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त पदभार देताना सेवाज्येष्ठता, कार्यालयीन समकक्षता, कार्यालयाचे व मुख्यालयाचे स्थान तसेच चौकशी चालू नसल्याची पार्श्वभूमी असे मुद्दे विचारात घेतले जातात. विस्तार संचालक पदासाठी मेघना केळकर व सुभाष काटकर यांची नावे आघाडीवर आहेत. केळकर सध्या विस्तार व नियोजन विभागाच्या पूर्णवेळ सहसंचालक असून त्यांच्याकडे मृदा संधारण विभागाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. केळकर स्पर्धेत राहिल्यास विस्तार संचालक होऊ शकतील. मात्र त्यांना कार्यकारी व इतर महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे त्या या पदाला कितपत न्याय देऊ शकतील तसेच त्यांना स्वतःला ही जबाबदारी स्वीकारण्यात स्वारस्य आहे का, याविषयी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात शंका उपस्थित करण्यात येत आहे.
नुकतेच नाशिकहून पुणे विभागीय कृषी सहसंचालक पदावर रुजु झालेले सुभाष काटकर हेदेखील विस्तार संचालकपदाच्या स्पर्धेत आहेत. उदय देशमुख यांच्याकडे असलेले स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक व विस्तार संचालक ही दोन्ही पदे काटकर यांच्याकडे सोपविले गेले तर आश्चर्य वाटायला नको, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. स्मार्टच्या अतिरिक्त प्रकल्प संचालकपदाच्या अतिरिक्त कार्यभारासाठी उज्ज्वला बाणखेले यांचे नाव चर्चेत होते. परंतु वरिष्ठ अधिकारी त्यासाठी अनुकूल नसल्यामुळे आणि बाणखेले बदलीसाठी प्रयत्नशील असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विस्तार संचालकाचा अतिरिक्त कार्यभार विनयकुमार आवटे यांच्याकडे देण्याच्या पर्यायावरही विचार होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे पूर्णवेळ संचालक असलेल्या आवटे यांच्याकडे सध्या अॅग्रीस्टॅक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. परंतु अॅग्रीस्टॅक विभाग सध्या आस्तित्वात नाही. या विभागाला स्वतंत्र यंत्रणा किंवा मनुष्यबळदेखील नाही. अॅग्रीस्टॅकची निर्मिती नव्या आकृतिबंधात केली गेली होती. परंतु, आता आकृतिबंधच रद्द झाल्यामुळे अॅग्रीस्टॅकची जबाबदारी दुय्यम अधिकाऱ्याकडे देत आवटे यांना विस्तार संचालकपद दिले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
‘गुणनियंत्रण’ बोरकर यांच्याकडेच?
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, की विस्तार संचालकाच्या नियुक्तीमुळे कृषी आयुक्तालयातील संचालकपदांच्या जबाबदाऱ्यांचे फेरवाटप शक्य आहे. मात्र, ‘आत्मा’चे पूर्णवेळ संचालक सुनील बोरकर यांच्याकडे असलेला निविष्ठा व गुणनियंत्रण पदाचा कार्यभार काढला जाण्याची शक्यता कमी राहील. परंतु पुढील वर्षी बोरकर निवृत्त झाल्यानंतर या पदावर सुभाष काटकर यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. काटकर यांना नाशिकच्या सहसंचालकपदाचा सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पुण्याचे विभागीय कृषी सहसंचाकपद देण्यात आले. त्यामुळे ते गुणनियंत्रण संचालक पदाच्या स्पर्धेत असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.