आमदार दातेंसमोरच सावंत-कोरडे भिडले
देवी भोयरेतील कार्यक्रमातील प्रकार ः आमदारांच्या मध्यस्थीने वादावर पडदा
पारनेर, ता. १० ः आमदार काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यात व्यासपीठावर शाब्दिक चकमक झाली. शेवटी आमदार दाते यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. या वादाची तालुकाभर चर्चा सुरू होती.
विरोधकांना कायमचे हद्दपार करण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांनी आपसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन आगामी निवडणुका लढल्या पाहिजेत. अंतर्गत मतभेद दूर करावेत, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर दौऱ्यात कालच (ता. ९) केले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला २४ तास सुद्धा झाले नाहीत, तोच देवी भोयरे येथे आयोजित कार्यक्रमात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आला.
आमदार दाते यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यात व्यासपीठावर शाब्दिक वादावादी झाली. त्यामुळे काही काळ सभेत तणाव निर्माण झाला. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच आमदार दाते यांनी स्वतः उठून सावंत यांच्या हातातील माईक घेतला आणि त्यांना खाली बसण्यास सांगितले. त्यानंतर दाते यांनी दोन्ही नेत्यांना समजावून सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
या वादामुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विकासकामांच्या श्रेयावरून हा वाद झाल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे. यापूर्वीही कान्हूर पठार येथील एका कार्यक्रमात व्यासपीठावर दोन्ही नेत्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता.
चौकट -
वर्चस्वासाठी लढाई
सावंत व कोरडे हे दोन्ही कान्हूर पठार जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्यात अंतर्गत स्पर्धा आहे. दोघेही महायुतीत असल्याने उमेदवारासाठीची ही लढाई असल्याचे बोलले जाते.
चौकट -
महायुती एकत्र ठेवण्याचे आव्हान
तालुक्यातील महायुतीत अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. कधी कामाच्या श्रेयावरून, तर कधी एकमेकांमधील हेवेदावे यारून वाद सुरू आहेत. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एकोपा ठेवण्याचे मोठे आव्हान आमदार दाते यांच्यासमोर आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.