सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ५ : नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. भारत मंडपम येथे आज ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६’च्या समारोप सत्रात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
केंद्र सरकारच्या ‘नवीकरणीय ऊर्जा राज्य मूल्यांकन आराखड्या’अंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राने गुजरातनंतर दुसरा क्रमांक मिळविला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली होती. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने मंत्रालयाने हा मूल्यांकन आराखडा विकसित केला आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेतील वाढ, धोरणात्मक व नियामक व्यवस्था, वीज ग्रिडची सज्जता, वीज वितरण कंपन्यांची कामगिरी आणि गुंतवणुकीसाठीचे वातावरण या निकषांवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले.
यानिमित्ताने नवीकरणीय ऊर्जा विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची या पुरस्काराने दखल घेण्यात आली आहे. जीवाश्म इंधनांव्यतिरिक्त इतर स्रोतांवर आधारित वीजनिर्मितीची स्थापित क्षमता २०३० पर्यंत ५०० गिगावॉटपर्यंत नेण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राच्या उपक्रमांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मंत्रालयाने नमूद केले. राज्याचा अनुभव आणि यशस्वी उपक्रम इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास मंत्रालयाचे सचिव संतोष सारंगी यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.