पुणे, ता. २३ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता. २८) होत आहे. यात महिला परीक्षार्थींना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी, बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, परीक्षेच्या वर्गखोलीमध्ये परीक्षार्थींचा चेहरा ‘सीसीटीव्ही’मध्ये स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. कान, डोके, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कपडा, आवरण असता कामा नये, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
‘टीईटी’साठी परीक्षा परिषदेने यापूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीत दुपट्टा, बुरखा, टोपी वापरता येणार नसल्याचे सांगितले होते. परंतु, महिला परीक्षार्थींना बुरखा, हिजाब, दुपट्टा वापरण्यास परवानगी देण्याबाबतची मागणी परीक्षा परिषदेकडे करण्यात आली. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी परिपत्रकाद्वारे हे स्वातंत्र्य स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा संदर्भ देत डॉ. बेडसे यांनी ‘यूपीएससी’, स्टाफ सिलेक्शन कमिशन, ‘सीए’, ‘सीएस’, ‘एमपीएससी’ अशा विविध स्तरावरील परीक्षांमध्ये चेहरा झाकणारे दुपट्टा, बुरखा, स्कार्फ, टोपी, गॉगल यांना प्रतिबंध केल्याची माहिती दिली आहे. तसेच, ओळख पडताळणी, बायोमेट्रिक पडताळणी, परीक्षा कालावधीत सीसीटीव्ही पडताळणीमध्ये चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असते. परीक्षावेळी चेहऱ्यावर हिजाब, बुरखा, दुपट्टा यावर बंदी घालण्यामागे परीक्षा कालावधीत उमेदवारांवर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार रोखणे, ओळख पडताळणी करणे, परीक्षेची पारदर्शकता, विश्वासार्हता कायम ठेवण्याचा उद्देश आहे, असेही परीक्षा परिषदेतर्फे सांगण्यात आले.
परीक्षेमध्ये मोबाइल बाळगणे, मोबाइलद्वारे प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲप/टेलिग्रामद्वारे पाठवणे, कानामध्ये अतिशय लहान आकाराचे वायफाय ब्लुटूथ ठेवणे, अशा प्रकारच्या युक्त्या वापरून गैरप्रकार होत आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच उमेदवारांचा संपूर्ण चेहरा, मान, तोंड, कान स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. तोंड झाकून ठेवल्यास कोण एकमेकांशी बोलत आहे, हे कळणार नाही. परीक्षा केंद्रात संशयावरून पडताळणीसाठी एखाद्या महिला परीक्षार्थीस चेहरा दाखवण्यास सांगितल्यास त्यातून वेगळाच प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेवेळी महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र, परीक्षेच्या वर्गखोलीमध्ये चेहरा ‘सीसीटीव्ही’मध्ये स्पष्ट दिसला पाहिजे, असे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.
‘‘राज्य परीक्षा परिषदेने नुकत्यात घेतलेल्या डीएलएड, संगणक लघुलेखन परीक्षेत परीक्षार्थींनी दुपट्टा, बुरख्यामध्ये मोबाइल लपवून परीक्षा केंद्रात आणल्याचे, त्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अतिशय संवेदनशील असून, त्यात एआय, ब्लूटूथ, शर्टच्या बटणासारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षार्थीचा चेहरा ‘सीसीटीव्ही’मध्ये दिसणे गरजेचे आहे’’
- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.