विधानसभानिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
एक लाख ९१ हजार मतदार स्थलांतरित; ८८ हजार ४९० मृत मतदारांची नोंद
सातारा, ता. ३१ : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात तब्बल २६ लाख ५१ हजार ३४७ मतदारांपैकी तीन लाख ४१ हजार ९२५ मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झालेले नाही. त्यांची गोळा करता न आलेले गणना प्रपत्र या प्रवर्गात नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना प्रपत्र देणे, ते भरून घेणे आणि मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील २३ लाख नऊ हजार ४२२ मतदारांचे (८७.१० टक्के) गणना प्रपत्र भरून व स्वाक्षरी करून प्राप्त झाले आहेत. उर्वरित तीन लाख ४१ हजार ९२५ (१२.९० टक्के) मतदारांच्या बाबतीत गृहभेटीनंतर गणना प्रपत्र प्राप्त झाले नसल्याचे आढळून आले.
या गोळा करता न आलेले गणना प्रपत्र प्रवर्गातील मतदारांची वर्गवारी लक्षवेधी आहे. त्यामध्ये एक लाख ९१ हजार ३८३ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ ८८ हजार ४९० मृत मतदार असून, ३४ हजार ९०५ मतदार अन्यत्र नोंदणी झालेले अथवा दुबार मतदार आणि २६ हजार ३२६ मतदार सापडू न शकलेले किंवा गृहभेटीवेळी गैरहजर होते. अन्य कारणांमुळे ८२१ मतदारांचा समावेश ‘इतर’ प्रवर्गात करण्यात आला आहे.
मात्र, या नोंदींचा अर्थ संबंधित मतदारांची नावे अंतिमतः मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, असा होत नाही. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित नागरिकांना दावा, हरकत आणि दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाईने निष्कर्ष न काढता प्रारूप मतदार यादी तपासणे महत्त्वाचे आहे. जिल्हा प्रशासनाने एसआयआर प्रक्रियेत सापडू न शकलेले/गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत आणि अन्यत्र नोंदणी झालेले/दुबार अशा एएसडीडी मतदारांच्या याद्याही उपलब्ध करून दिल्या आहेत. या याद्या जिल्हा प्रशासनाच्या एनआयसी या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत, तसेच प्रारूप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तहसील कार्यालय, मतदार नोंदणी कार्यालय आणि संबंधित बीएलओ यांच्याकडेही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
...........
चौकट
प्रारूप यादीत नाव नसल्यास संबंधित नागरिकांनी प्रपत्र क्रमांक सहा भरून मतदार नोंदणी करता येईल. एखाद्या नावाबाबत आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक सात, तर मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी प्रपत्र क्रमांक आठ भरता येईल. दावे व हरकती ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत. प्रपत्र क्रमांक सहा, सात आणि आठ ऑनलाइन भरण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या Voters’ Service Portal चा वापर करता येईल. दरम्यान, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
...............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.