पुणे

महेश्वरी साडीला जागतिक ओळख मिळवून देण्याचा प्रवास

CD

रेवा सोसायटी : महेश्वरी साडीला जागतिक ओळख मिळवून देण्याचा प्रवास

रेवा सोसायटीची स्थापना १९७८ मध्ये झाली. शिवाजीराव होळकर आणि त्यांच्या पत्नी शैली होळकर यांनी या सोसायटीची स्थापना केली. शिवाजीराव (रिचर्ड) होळकर यांचाही या कार्यात महत्त्वाचा सहभाग आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळावा आणि महेश्वरमधील विणकाम व्यवसायाला चालना मिळावी, हा या संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता.

त्यावेळी महेश्वरमध्ये रोजगाराची साधने फारशी उपलब्ध नव्हती. त्यामुळे बाहेरून विणकरांना बोलावून स्थानिक लोकांना विणकामाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला दोन हातमाग सुरू करण्यात आले. त्यानंतर हळूहळू गावातील लोकांना बोलावून विणकाम शिकवले आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज महेश्वरमध्ये साधारण पाच ते सहा हजार हातमाग सुरू आहेत. या व्यवसायाच्या वाढीचे श्रेय शैली होळकर आणि शिवाजीराव होळकर यांना जाते.

महेश्वरी साडीची खास ओळख म्हणजे तिचे डिझाइन. महेश्वरच्या किल्ल्यावरील आणि घाटांवरील दगडी नक्षीकामातून साडीच्या काठासाठी विविध डिझाइन्स तयार करण्यात आली. घाटांवर असलेल्या नक्षींचे ग्राफिक स्वरूपात रूपांतर करून ते साडीच्या बॉर्डरमध्ये विणण्यात आले. याच वैशिष्ट्यामुळे या साडीला ''महेश्वरी साडी'' हे नाव मिळाले.

महिलांना घरबसल्या रोजगार
आमच्या कामाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. हातमागावर एका मागावर एक व्यक्ती काम करते. सध्या महेश्वरमध्ये पाच ते सहा हजार हातमाग सुरू असून, त्यावर साधारण तेवढेच कारागीर काम करत असल्याचा माझा अंदाज आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. साधारण सहा हजार कारागिरांपैकी पाच हजार महिला असाव्यात, असा माझा अंदाज आहे. मात्र, याची अधिकृत आकडेवारी काढण्यासाठी स्वतंत्र सर्वेक्षण करावे लागेल. हा व्यवसाय महिलांना घरबसल्या काम करण्याची संधी देतो.

विणकरांच्या कल्याणासाठीही संस्थेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विणकरांना राहण्यासाठी घरे बांधून देण्यात आली, त्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अहिल्या बाल ज्योती स्कूल सुरू करण्यात आली. या शाळेत विणकरांची मुले शिक्षण घेत होती. आमची संस्था नफ्यासाठी चालवली जात नाही. संस्थेतून मिळणारा पैसा शाळेतील मुलांच्या शिक्षणावर, विणकरांच्या कल्याणावर आणि कर्मचाऱ्यांवर खर्च केला जातो. हा एक सेवाभावी उपक्रम आहे.

महेश्वरी साडीचे विविध प्रकार
आमच्याकडे प्रामुख्याने चार ते पाच प्रकारच्या साड्या तयार केल्या जातात. त्यामध्ये सिल्क बाय कॉटन, प्युअर सिल्क, गर्व रेशमी आणि प्युअर कॉटन साड्यांचा समावेश आहे. सिल्क बाय कॉटन साडीमध्ये ताणा सिल्कचा, तर बाणा ८० नंबरच्या कॉटन धाग्याचा असतो. प्युअर सिल्क साडीसाठी कोषापासून तयार होणाऱ्या मलबरी सिल्कचा वापर केला जातो. गर्व रेशमी साडीमध्ये ५० टक्के सिल्क आणि ५० टक्के कॉटन असते. याशिवाय शुद्ध सुती साड्याही तयार केल्या जातात. या साड्यांची विक्री देशभर केली जाते. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि चंदीगडसह विविध मोठ्या शहरांमध्ये आमची प्रदर्शने भरवली जातात. त्यातून महेश्वरी साड्यांना देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते.

सिल्क बंगळुरूहून, जरी सुरतमधून ...
साड्यांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आम्ही वेगवेगळ्या शहरांतून मागवतो. सिल्क बंगळुरूहून, कॉटन कोईम्बतूरहून, तर जरी गुजरातमधील सुरत येथून आणली जाते. कच्चा माल वर्षभरासाठी एकाच वेळी मागवला जात नाही. साधारण १५ दिवस ते महिनाभर पुरेल एवढा साठा मागवला जातो. हातमागांची संख्या अधिक असल्यामुळे एका महिन्याचा मालही लवकर संपतो. त्यामुळे नियमितपणे नवीन ऑर्डर द्यावी लागते. जरीचीही महिन्यातून साधारण दोन वेळा मागणी केली जाते.

हातमाग आणि पॉवरलूममधील फरक
आमच्या संस्थेत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते. आम्ही शुद्ध सिल्क आणि दर्जेदार धाग्यांचा वापर करतो. मात्र, बाजारात काही ठिकाणी पॉलिस्टर किंवा बनावट सिल्कचा वापर करून साड्या तयार केल्या जातात. काही दुकानदार पॉवरलूमवर तयार झालेल्या साड्या ''सेमी महेश्वरी'' या नावाने विकतात. त्यामुळे अस्सल हातमाग महेश्वरी साडीची ओळख धोक्यात येत आहे.

आमच्या संस्थेत साध्या पदराच्या साडीची सुरुवात ४,३९९ रुपयांपासून होते. बाजारात पॉवरलूमवर तयार झालेल्या साड्या १,५०० ते १,८०० रुपयांपर्यंत मिळतात. मात्र, या दोन्हींच्या निर्मितीतील कच्चा माल आणि गुणवत्तेत फरक आहे. आमच्याकडे धाग्यांच्या रंगाईसाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो आणि रंग जाणार नाही, याची आम्ही खात्री देतो. त्यामुळे अस्सल हातमाग साडी आणि पॉवरलूम साडी यांतील फरक ग्राहकांनी समजून घेणे आवश्यक आहे.

रेवा सोसायटीच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होणार
१९७८ मध्ये स्थापन झालेल्या रेवा सोसायटीला २०२६ मध्ये ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी दोन वर्षांनी संस्थेची सुवर्णमहोत्सवी वाटचाल पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने एक विशेष साडी संग्रह तयार करण्याचे आमचे नियोजन आहे. अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आम्ही ''द अहिल्या कलेक्शन'' अर्थात ''३०० इयर्स अहिल्यादेवी कलेक्शन'' सादर केले होते. त्याच धर्तीवर रेवा सोसायटीच्या ५० वर्षांच्या प्रवासानिमित्त खास संग्रह तयार केला जाईल. या संग्रहामध्ये नवीन डिझाइन्स, रंगसंगती आणि वैशिष्ट्यपूर्ण साड्यांचा समावेश असेल. या संग्रहाचे अनावरण मुंबईत करण्याचे नियोजन आहे. त्याची तयारी अनावरणाच्या एक वर्ष आधीपासून सुरू केली जाईल.

महेश्वरी साडी : आणखी संशोधन आवश्यक
अहिल्यादेवी होळकर यांच्या निधनानंतर म्हणजे १७९५ नंतरही महेश्वरी साडीचे विणकाम सुरू होते. मात्र, पुढील काळात या व्यवसायात लोकांचा रस कमी झाला. त्यानंतर शिवाजीराव होळकर यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा आणि या पारंपरिक व्यवसायाला पुन्हा चालना मिळावी, यासाठी प्रयत्न केले. महेश्वरमध्ये रेवा सोसायटीशिवाय सरकारी हातमाग प्रशिक्षण केंद्रही होते.
...............

महेश्‍वरी साडी : अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीचा वारसा

महेश्वरी साडी ही केवळ एक पारंपरिक वस्त्र नसून लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीतून राजाश्रय मिळालेल्या विणकाम कल्याचा ऐतिहासिक वारसा आहे. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेले महेश्वर शहर हे या साडीचे जन्मस्थान मानले जाते. अठराव्या शतकात अहिल्यादेवींनी महेश्वरला राजधानी केल्यानंतर येथील विणकाम कलेला विशेष प्रोत्साहन दिले. राजघराण्यातील महिलांसाठी आणि दरबारातील मान्‍यवरांना भेट देण्यासाठी येथे खास साड्या विणण्याची परंपरा विकसित झाली. कुशल विणकरांना महेश्वर येथे आमंत्रण दिल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. कापूस आणि रेशमाच्या मिश्रणातून तयार होणारा हलका व मऊ पोत हे या साडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या साड्यांच्या डिझाईनमध्ये महेश्वरच्या किल्ल्याच्या वास्तुकलेपासून प्रेरित भौमितिक नक्षी, जसे की चटई, विटा, चमेली आणि हिऱ्याच्या पारंपरिक आकृत्यांचा वापर केला जातो. याशिवाय पट्टे, चौकडी आणि वैशिष्ट्यपूर्ण पदर साडीचे सौंदर्य अधिक खुलवतात. अनेक महेश्वरी साड्या दोन्ही बाजूंनी वापरता येतात, जी विणकामातील उच्च पातळीवरील कौशल्य दर्शवते. लोकमाता अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीमुळे राजाश्रय मिळालेली ही समृद्ध वस्त्रकला आजही स्थानिकांचे कौशल्य आणि भारतीय परंपरेचा ठेवा अभिमानाने जपताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT