जननायक मकरंद (आबा) पाटील
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीने, अहोरात्र झटून काम करणाऱ्या या लाडक्या, तडफदार, जिद्दी, मुत्सद्दी आणि वेळप्रसंगी आपल्या लोकांसाठी सत्तेची पदे पणाला लावून थेट रणांगणात उतरणाऱ्या, दिलेला शब्द पाळणाऱ्या आणि आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर अल्पावधीतच राज्याच्या कानाकोपऱ्यात आपली छबी उमटवणाऱ्या मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद (आबा) पाटील यांचा आज (गुरुवार) वाढदिवस यानिमित्त...
- रमेश धायगुडे, लोणंद.
----
कृष्णाकाठच्या दक्षिण काशी वाईचा सुसंस्कृत विचारांचा वारसा लाभलेल्या राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्रिपदाची आणि बुलडाण्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा ते सक्षमपणे सांभाळणारे मकरंद (आबा) पाटील यांना राजकारण व समाजकारणाचे धडे घरातूनच मिळाले. विशेषतः त्यांचे वडील माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचा राजकीय वारसा जोपासत मकरंद आबा किसन वीर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राजकारण व समाजकारणात अहोरात्र झटून काम करत आहेत. देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर कमालीची श्रद्धा बाळगून उपमुख्यमंत्री (कै.) अजितदादा पवार यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात काम करत आहेत. मकरंद आबांनी इंजिनिअरिंगची पदवी संपादन केल्यानंतर सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिले. कोणतेही काम करताना ते काम गांभीर्याने घेऊनच ते करतात व ते तडीस नेतात. सामान्यांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना मदतीचा हात देऊन माणूस उभा करण्याच्या कार्यशैलीमुळे मकरंद आबा तिन्ही तालुक्यांतील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आता राज्यातही त्यांची वजनदार मंत्री म्हणून छबी उमटत आहे. सत्तेचा व पदाचा वापर सामान्यांच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे, असा त्यांचा स्वतःचा कटाक्ष आहे. ते स्वतः पाळून कार्यकर्त्यांनाही तो कानमंत्र देतात. पक्षपातळीवर काम करताना आबा त्याच तडफेने काम करत असतात. बोपेगावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य व चारवेळा आमदार, आता मंत्री, पालकमंत्री, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपदापर्यंत धडक मारणाऱ्या आबांची कामाची धडाडी कायम राहिल्याने यशस्वी नेते म्हणून या तिन्ही तालुक्यांत तसेच संपूर्ण जिल्ह्यात ते पुढे आहेत.
खंडाळा तालुक्यातील खंडाळा पंचायत समिती, लोणंद बाजार समिती, खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना, तालुका खरेदी-विक्री संघ, लोणंद व खंडाळा या नगरपंचायती, तसेच तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायती आदी सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिपत्याखाली आणून ठेवण्यात आबांचा सिंहांचा वाटा आहे. पाच वर्षांपूर्वी स्वतःची आमदारकी पणाला लावून आर्थिक संकटात आडकलेल्या खंडाळा साखर कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवली. पहिल्याच निवडणुकीत तालुक्यातील विविध पक्षांतील मातब्बर नेते व कार्यकर्ते यांची एकत्र मोट बांधून सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून या कारखान्याची एकहाती सत्ता काबीज करण्यात आमदार मकरंद आबांचा सिंहाचा वाटा आहे. कोणत्याही स्थितीत खंडाळा कारखाना सुरू करण्याचा निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळून मकरंद आबांनी बँकांनी लिलावात काढलेला हा कारखाना पाच वर्षांपूर्वी प्रत्यक्षात सुरू करून शब्द पाळला. यावर्षीही गव्हाणीत उसाची मोळी टाकून या वर्षाचा गाळप हंगामही त्याच जोमाने सुरू झाला आहे. भुईंज कारखान्याचाही गाळप हंगाम सुरू झाला आहे. भुईंज कारखान्याची एकहाती सत्ता काबीज करून भुईंज साखर कारखान्याचेही ते स्वतः अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत. तोही कारखाना आबांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्तीकडे वाटचाल करत आहे. बहुतांशी देणी चुकती करून तोही साखर कारखाना आर्थिक संकटातून बाहेर निघेल. मात्र, त्यासाठी सभासदांनी हे दोन्ही कारखाने आपले आहेत, असे मानून या कारखान्यांनाच ऊस दिला पाहिजे, तरच हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालून येणाऱ्या तीन-चार वर्षांत कर्जमुक्त होण्यास मदत होणार आहे. या प्रकारचे आवाहनही मंत्री मकरंद पाटील सातत्याने करत आहेत आणि तसा विश्वासही या तिन्ही तालुक्यांतील जनतेला देत आहेत.
खंडाळा तालुक्यावर आबांनी राजकीय व विकासात्मक लक्ष केंद्रित केल्याने खंडाळा तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद प्रथम मिळाले. खंडाळा तालुक्याला वरदान ठरलेल्या धोम-बलकवडी व नीरा-देवघर या प्रकल्पांचे पाणी खंडाळ्यात वाघोशीच्या ६५ किलोमीटरपर्यंत आणण्यासाठी आबांनी यशस्वी प्रयत्न केल्यानेच तालुक्यात या दोन्ही प्रकल्पांचे पाणी सर्वत्र खळाळत आहे. नीरा-देवघरच्या गावडेवाडी, शेखमीरवाडी व वाघोशी या तीन उपसा जलसिंचन योजनांची कामेही येत्या काही दिवसांत सुरू होतील. शिरवळ, लोणंद, खंडाळा व केसुर्डी औद्योगिक वसाहतीत येणारे प्रकल्प हे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील तरुणांच्या व व्यावसायिकांच्या हाताला काम मिळावे, असेच दर्जेदार व जागतिक पातळीवर नावाजलेल्या कंपन्या याव्यात, यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
नीरा-देवघरच्या बाबतीत तर मकरंद आबांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढून राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना रखडलेले या प्रकल्पाच्या कालव्याचे काम शेतकऱ्यांशी व अधिकारी यांच्याशी समन्वय साधून निकाली काढल्याने या प्रकल्पाचे पाणी पुढे जाऊ शकले. शेखमीरवाडी हद्दीतील फाॅरेस्ट प्रश्नही त्यांनी अशाच पद्धतीने निकाली काढल्याने या कालव्याचे काम वाघोशीपर्यंत पूर्ण होऊन या प्रकल्पाचे पाणी वाघोशीपर्यंत येऊ शकले आहे. त्यामुळे खंडाळ्याचा दुष्काळ कायमचाच नाहीसा झाला आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री मकरंद आबा यांचा सिंहाचा वाटा आहे. सरकार कोणतेही असो मकरंद आबा कामात कुठेही कमी पडत नाहीत. निधी उपलब्ध करून घेण्यात ते माहीर आहेत. लोणंद, शिरवळ व खंडाळा या शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी त्यांनी आराखडा आखला असून, त्या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत. या तिन्ही ठिकाणी २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेऊन आधी अधिक पूर्णत्वास गेली आहेत. भुयारी गटारे, अंडरग्राऊंड वीजवाहिनी, सांडपाणी प्रकल्प व कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित करून भरघोस निधीही उपलब्ध केला आहे. तालुक्यातील अंतर्गत रस्ते भक्कम करण्याचेही त्यांचे नियोजन आहे. कोणी बरोबर असो अथवा नसो. याची फिकीर न बाळगता मकरंद आबा आहे त्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांना ताकद देऊन आपले काम प्रामाणिकपणे करत राहतात. त्यामुळेच सत्तास्थाने त्यांच्यापासून लांब जात नाहीत. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची काम करण्याची पद्धत आहे, त्यामुळे लहान-थोरांमध्ये आबा लोकप्रिय आहेत. गावागावांत कार्यकर्त्यांना जाऊन भेटणे त्यांचे लहान-मोठे कार्यक्रम अटेंड करणे यात त्यांचा दिवस आणि रात्र कधी संपते, हे त्यांचे त्यांनाच माहीत नसते. देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात तर आबांनी तिन्ही तालुक्यांतील जनतेसाठी झटून काम केले आहे. स्वतःच्या आमदार निधीतून मोठा निधी देऊन आरोग्य सुविधा पुरवून येथील जनतेची आरोग्यसेवाही केली आहे. अतिवृष्टीमुळे वाई, महाबळेश्वर, पाचगणी व खंडाळ्याच्या पश्चिम भागात शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी आबांच्या पुढाकार घेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शेकडो जेसीबी मशिन, ट्रॅक्टर महिनाभर अहोरात्र लावून हजारो एकर जमीन व जमिनीचे बांध, ताली पूर्ववत करून जमिनी पिकाऊ करून देत या शेतकऱ्यांना दिलासा दिला. खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून घेऊन नुकसान भरपाई दिली. सामाजिक बांधीलकी मानून माणसातला माणूस बनून राहून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मकरंद आबा मंत्री म्हणून अहोरात्र झटून काम करत आहेत. सरकारची मदत झोपडीतल्या माणसांपर्यंत पोहोचवून त्याच्या झोपडीत मदतीचा दिवा लावून आनंदाचा प्रकाश पसरवत आहेत. त्यासाठी मकरंद आबा इमाने इतबारे अहोरात्र झटून काम करत आहेत. माणसातल्या या लोकप्रिय नेत्याला त्यांच्या मनातील सर्व प्रकारच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे. अशा प्रकारची प्रार्थना आपणा सर्वांच्या वतीने ईश्वराकडे करूया. या ‘कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व राज्याच्या मंत्रिमंडळातील एक सक्षम, विश्वासू व वजनदार मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!
फोटो : मकरंद पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.