सत्ताधाऱ्यांनाच विकासाचे वावडे
मलकापूर पालिकेतील विरोधी नगरसेवकांनी केला आरोप
मलकापूर, ता. ३ : पालिका हद्दीतील विविध रस्त्यांच्या विकासकामांसाठी जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्र्यांकडून स्वतंत्र निधी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी पालिकेने ठराव द्यावा, यासाठी चार महिन्यांपासून नगराध्यक्ष, उपाध्यक्षांकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून ठराव देण्यास टाळाटाळ होत आहे. सत्ताधाऱ्यांनाच मलकापूरच्या विकासाचे वावडे असून, तेच इतर लोकप्रतिनिधींकडून निधी आणून विकास करण्याला खोडा घालत असल्याचा आरोप पालिकेतील विरोधी नगरसेवकांनी केला.
येथील पालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. त्यानंतर विरोधी नगरसेवकांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी नगरसेवक भीमाशंकर माहूर म्हणाले, ‘‘माझ्या प्रभागातील पाच रस्त्यांच्या विकासकामांसाठी मी मंत्री, खासदार, आमदारांकडून निधी मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहे. हा निधी मिळवताना पालिकेचा ठराव गरजेचा आहे. त्यासाठी चार महिन्यांपासून नगराध्यक्ष, उपाध्यक्षांकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. कोणत्या रस्त्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे किती निधी मागणार आहे, हे सांगा, असे नगराध्यक्ष विचारतात, तर ठरावाची गरज नसते, अगोदर निधी आणा मग ठराव देऊ, असे उपाध्यक्षांकडून सांगितले जाते. त्यामुळे गेली अनेक दिवसांपासून या रस्त्यांसाठी निधी मिळू शकला नाही.
दहा वर्षांपूर्वी शहरातील झालेल्या रस्त्याच्या कामांचे बिल काढण्यासाठी आत्ता सभागृहापुढे विषय आला आहे. त्याचे बिल आतापर्यंत का दिले नाही? आता या रस्त्याचे बिल काढण्याचे कारण काय? त्या रस्त्यावर आता पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत, तो रस्ता नव्याने दुरुस्त करण्याची गरज असताना दहा वर्षांपूर्वीच्या रस्त्याचे बिल काढण्यास ठाम विरोध असल्याचे नगरसेवक दादा शिंगण यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगार व त्यांना प्रत्यक्ष असलेला पगारामध्ये मोठी तफावत आहे. त्यातही कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार होत नसल्याने त्यांचे कुटुंब चालवताना ओढाताण होते. बँकांचे हप्ते व इतर कारणांसाठी त्यांना वेळेवर पगार मिळणे गरजेचे आहे. शहरातील अनेक रस्त्यांची कामे मंजूर होऊनही अद्यापपर्यंत रखडलेली आहेत. त्यात अनेक कामे कोणाच्या कार्यकर्त्याला द्यायची? अनेक प्रभागांतील कामे अद्यापपर्यंत सुरू झाली नाहीत. सत्ताधारीच नागरिकांना वेठीस धरत असल्याचा प्रकार घडत असल्याचा आरोपही श्री. माहूर यांनी केला.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.