मालगावजवळ न्हाळेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू
सातारा, ता. ३ : सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २६ महिन्यांच्या निष्पाप बालकाचा करुण अंत झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली. जय संदीप खंडागळे (वय २६ महिने) असे या निष्पाप बालकाचे नाव आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला होता. मात्र, बिबट्याने केलेल्या गंभीर हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मालगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वन विभागाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगावजवळील न्हाळेवाडी येथील वस्तीच्या पाठीमागील ओढ्याच्या परिसरात सायंकाळी ७:१५ ते ७:३० च्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. याच अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अवघ्या २६ महिन्यांच्या जयवर अचानक झेप घेतली आणि त्याला पाठीमागच्या शेताच्या अन् ओढ्याच्या दिशेने ओढत नेले.
मुलाला बिबट्याने पळवून नेल्याचे समजताच गावातील तरुणांनी अंधारातच तत्काळ शोधाशोध सुरू केली. वस्तीच्या पाठीमागील ओढ्यामध्ये बिबट्या मुलाला घेऊन बसलेला दिसताच तरुणांनी मोठा गोंधळ घालून बिबट्याला पळवून लावले. मात्र, बिबट्याच्या तीक्ष्ण दातांमुळे अन् पंजाच्या गंभीर हल्ल्यामुळे चिमुरडा जय गंभीर जखमी झाला होता. त्याला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
वन विभाग अन् महावितरणविरोधात संताप
----------
निष्पाप बालकाचा असा दुर्दैवी बळी गेल्याने न्हाळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐन संध्याकाळी वीजपुरवठा खंडित होणे आणि वन विभागाचे बिबट्यांच्या वाढत्या वावराकडे होणारे दुर्लक्ष यामुळेच हा निष्पाप जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पिंजरा लावण्याची मागणी
-----------
वन विभागाने या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन या परिसरात नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.