लोगो : माळशिरस तालुका
-----
पं.स. सभापतिपदासाठी वैष्णवीदेवी की विमल जानकर?
सभापतिपदासाठी दोन माजी सभापतींमध्ये चुरस; निकालांनी राजकीय समीकरणे बदलली
सुनील राऊत : सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. १० : माळशिरस पंचायत समितीचे सभापतिपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असून, या पदासाठी वेळापूर गटातून विजयी झालेल्या माजी सभापती वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील व विमल उत्तमराव जानकर या दोघी प्रमुख दावेदार ठरल्या आहेत. या दोघींपैकी एकीच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार असल्याने तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.
माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९ व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी अतिशय चुरशीची व अटीतटीची निवडणूक झाली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व दोन्ही शिवसेना पक्ष एकत्र येत २७ जागा लढविण्यात आल्या. या आघाडीला पंचायत समितीच्या १२ व जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ७ जागांवर यश मिळाले.
माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपचे नेतृत्व करत स्वबळावर २७ पैकी २७ जागांवर उमेदवार उभे केले होते. या लढतीत भाजपला जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या सहा जागांवर यश मिळाले.
या निवडणुकीत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचा गुरसाळे गणात दत्तात्रय शेळके यांच्याकडून पराभव झाला. पिलीव गणात यज्ञसेना संग्रामसिंह जहागीरदार यांचा नम्रता शिवराज पुकळे यांच्याकडून पराभव झाला. कन्हेर गणात डॉ. रामदास देशमुख यांचे चिरंजीव यशराज यांना नवख्या आनंदराव शेंडगे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
संग्रामनगर गणात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्या सून राजेश्वरी कृष्णराज माने-पाटील यांचा निशा किशोर गिरमे यांच्याकडून पराभव झाला. वेळापूर गणात आमदार उत्तमराव जानकर यांच्या पत्नी विमल जानकर यांनी माजी सभापती सूर्यकांत माने-देशमुख यांचे चिरंजीव अमृतराज यांचा पराभव केला. यशवंतनगर गणात वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी अशोक एकतपुरे यांचा पराभव करत विजय मिळवला.
या निकालांमुळे अर्जुनसिंह मोहिते-पाटील व जीवन जानकर यांच्या पराभवाने मोहिते-पाटील व जानकर गटाची अवस्था ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी झाल्याची राजकीय चर्चा तालुक्यात सुरू आहे.
---
चौकट
ठळक बाबी...
- पंचायत समिती सभापतिपदासाठी वैष्णवीदेवी मोहिते-पाटील व विमल जानकर प्रमुख दावेदार.
- आघाडीला पं.स.च्या १८ पैकी १२, जि.प.च्या ९ पैकी ७ जागा
- भाजपला पं.स.च्या ६ व जि.प.च्या २ जागा
- अर्जुनसिंह मोहिते-पाटील व जीवन जानकर यांचा पराभव ठरला चर्चेचा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.