मंद्रुळकोळ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन
पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून साकव पूल; स्मशानभूमी, संरक्षक भिंतीच्या कामास प्रारंभ
ढेबेवाडी, ता. ३० : मंद्रुळकोळे- बौद्धवस्ती (ता. पाटण) येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मंजुरी मिळालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज झाले.
बौद्धसमाजासाठी गावचे सुपुत्र मीरा- भाईंदर महानगरपालिकेचे माजी आयुक्त सुदामराव गायकवाड यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई- वडिलांच्या स्मृतीनिमित्ताने वांग नदीकाठी स्वखर्चाने स्मशानभूमी बांधली होती; परंतु अतिवृष्टीत नदीला आलेल्या महापुरात तिला नुकसान पोहचले. याबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री देसाई यांनी आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधण्याकरिता १५ लाख व जनसुविधामधून दुरुस्तीसाठी तीन लाख ९० हजार रुपये मंजूर केले.
या कामाचे भूमिपूजन, तसेच मंद्रुळकोळे- बौद्धवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३९ लाखांच्या साकव पूल बांधण्याच्या कामाचा प्रारंभ आज झाला. माजी आयुक्त सुदामराव गायकवाड, रणजित पाटील, सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच सपना पाटील, सदस्या कोमल गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम पाटील, बाजीराव पाटील, आकाराम पाटील, लालासाहेब पाटील, सरदार पाटील, बाळासाहेब पाटील, विलास सावंत, विनोद कांबळे, प्रल्हाद कांबळे, रमेश भोसले, दिनकर साखरे, तानाजी साखरे आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रयाग कांबळे यांनी आभार मानले.
या वेळी रणजित पाटील म्हणाले, ‘‘तुम्ही टाकलेल्या विश्वासाची पोच शंभूराज देसाई यांनी तुम्हाला दिली असून, आम्ही केवळ निमित्त मात्र आहे. नवीन पाणी योजनेसह येथील सुविधांचे काही प्रलंबित प्रश्न नजीकच्या काळातच मार्गी लागतील.’’
श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘समाजाची गैरसोय दूर करण्यासाठी मी स्वखर्चाने स्मशानभूमी उभारली होती; परंतु दुर्दैवाने नैसर्गिक आपत्तीत तिला नुकसान पोचले. यापुढच्या काळातही समाजाकडे लक्ष असू द्या. विविध कामांसाठी आवश्यक ते सहकार्य मी देईन.’’
------------------
07946
मंद्रुळकोळे : विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी सुदामराव गायकवाड, भाग्यश्री पाटील, रणजित पाटील आदी.
------------------------