लोगो : मंगळवेढा तालुका
---
जि.प.-पं.स. निवडणुकीत जात फॅक्टर ठरला प्रभावी
पैसा अन् संघटनशक्तीही ठरली निर्णायक; अनेक गटांत धक्कादायक निकाल
हुकूम मुलाणी : सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १० : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यात भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत जात हा घटक सर्वाधिक प्रभावी ठरला असून, त्यानंतर पैसा व विकासकामांचा मुद्दा विजयासाठी निर्णायक ठरल्याचे चित्र दिसून आले. नगरपालिका निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याचा घेतलेला संकल्प, या निवडणुकीतही यशस्वी ठरला. तालुक्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर ‘कमळ’ फुलले आहे.
नऊ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीनंतर झालेल्या या निवडणुकीत अनेक नवीन राजकीय संदर्भ पुढे आले. दामाजीनगर जिल्हा परिषद गटात नवखे उमेदवार महावीर ठेंगील यांना रमेश भांजे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र दामाजीनगर पंचायत समिती गणात धनगर समाज, तर बोराळे गणात लिंगायत समाजाचा प्रभाव निर्णायक ठरला. याच पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे दोन उमेदवार विजयी झाले. आमदार समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांच्या प्रयत्नातून रमेश भांजे यांनी पंचायत समितीनंतर जिल्हा परिषद निवडणूकही जिंकली. या गटात निवडणुकीदरम्यान भीमा नदीला पाणी न सोडल्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला. वारंवार गट बदलाचा आरोप असूनही मतदारांनी तो नाकारला.
बोराळे पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या सुमैय्या तांबोळी यांना येथे स्वतःचे मत नसतानाही अवघ्या काही दिवसांत मिळालेली ४ हजार ६९० मते निर्णायक ठरली. मात्र उच्चशिक्षित जयश्री कवचाळे यांचा पंचायत समितीत प्रवेश झाला. हुलजंती जिल्हा परिषद गटात हनुमंत दुधाळ यांनी चार वर्षांपासून केलेली तयारी आणि धनगर समाजाचा प्रभाव यामुळे त्यांना भालेवाडी, हाजापूर, तळसंगी, मरवडे व हुलजंती गणातून मोठे मताधिक्य मिळाले. भाजपमध्ये केलेल्या प्रवेशावर विरोधकांनी केलेला प्रचार मतदारांच्या गळी उतरला नाही.
लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात उमेदवार निश्चितीतील उशीर विरोधकांना भोवला. आमदार समाधान आवताडे यांनी करुणा शिवशरण यांना सुरवातीपासून ताकदीने मैदानात उतरवत प्रभावी प्रचारयंत्रणा राबवली. चोखामेळानगर गणात विरोधी उमेदवारांचा पाठिंबा निर्णायक ठरला, मात्र संगीता लेंडवे यांना प्रचार न करता मिळालेली ३ हजार २६२ मतेही लक्षवेधी ठरली. या गटात विरोधी आघाडीत समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला.
लक्ष्मी दहिवडी गणात उच्चशिक्षित विनायक यादव विजयी झाले. भोसे जिल्हा परिषद गटातील लढत अत्यंत हाय व्होल्टेज ठरली. सुरवातीला ‘बाहेरचा विरुद्ध भूमिपुत्र’ अशी सुरू झालेली लढत शेवटी पैसा व जात या घटकांवर येऊन थांबली. नंदेश्वर, शिरनांदगी, रड्डे व मानेवाडी येथील मताधिक्यामुळे तसेच ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या पाठबळामुळे प्रदीप खांडेकर यांचा विजय सुकर झाला.
------
स्वतःचे मत नसताना विजय,
लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार करुणा शिवशरण या माचणूरच्या तर प्रदीप खांडेकर हे हिवरगावचे आहेत, त्यामुळे दोघांनाही स्वतःला स्वतःचे मत टाकण्याचा अधिकार नव्हता. मात्र, आमदार समाधान आवताडे यांचे संघटन कौशल्य व स्वतःच्या अस्तित्वावर निवडणूक जिंकत विजयापर्यंत गेले. मात्र या निवडणुकीत झालेली आर्थिक उलाढाल पाहता भविष्यातील निवडणुका अन्य जातीतील व्यक्ती किंवा व्यक्तीच्या विकासकामांकडे न बघता पैसा व जात फॅक्टरवर चालणार असल्याचे स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.