मंगळवेढा पालिकेत गैरव्यवहार; वरिष्ठांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह
लिपिकावर गुन्हा दाखल; चौकशी समितीने इतरांची जबाबदारी तपासली का?
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १७ ः नगरपालिकेतील २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणात सहा लाख ५७ हजार ५८८ रुपयांची रक्कम पालिकेकडे जमा न करता स्वतःकडे वापरल्याचा ठपका ठेवत एका लिपिकावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित रक्कम व त्यावर शासकीय दराने व्याज आकारून वसूल करण्यात आली असली, तरी एवढी मोठी रक्कम दीर्घकाळ पालिकेकडे जमा न होता, संबंधित कर्मचाऱ्याकडे राहिली, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी काय करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीत केवळ लिपिकाचीच जबाबदारी निश्चित करण्यात आली का, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय इंगळे यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मंगळवेढा नगरपालिकेत घाटोळा झाल्याचा दावा करत त्यांनी केवळ २०२२-२३ या आर्थिक वर्षाचेच नव्हे, तर २०२३-२४ अन् २०१९-२० चेही लेखापरीक्षण करण्याची मागणी केली होती.
मात्र, उपलब्ध माहितीनुसार २०२२-२३ या एका आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करून सहा लाख ५७ हजारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. संबंधित रक्कम शासकीय दराने व्याजासह वसूल करण्यात आली असली, तरी वर्षभर पालिकेची एवढी मोठी रक्कम जमा झाली नाही, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेकडून नागरिकांकडून कराच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाते. त्यातून मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशाच्या व्यवहारावर नियमित देखरेख अन् आर्थिक नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची असते. त्यामुळे या प्रकरणात केवळ रक्कम वसूल करून प्रकरण संपणार की आर्थिक नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या इतरांचीही भूमिका तपासली जाणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
चौकशीसमोर तीन महत्त्वाचे प्रश्न
- पर्यवेक्षणाचा अभाव ः दररोज गोळा होणाऱ्या कराच्या रकमेचा हिशेब तपासण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष का झाले, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
आर्थिक नियंत्रण कोणाचे ः महिनोन्महिने पालिकेची रक्कम तिजोरीत जमा होत नसेल, तर आर्थिक व्यवहाराची नियमित तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना याची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतरांची भूमिकाही तपासणार का ः हा प्रकार केवळ संबंधित लिपिकाच्या पातळीवर झाला की त्यामध्ये इतर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचीही भूमिका होती, याची चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशी समितीने संबंधित सर्व स्तरांवरील जबाबदारी तपासली का, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.