ढिंगटांग
रिपोर्टर मी होणार..!
ज्याला जे जमते ते त्याने व्हावे, हा जगण्याचा एक सरळसाधा नियम आहे. बालपणी आम्हाला अनेकदा ‘बाळ, तू मोठेपणी कोण होणार?’ असे कुणीतरी विचारीत असे. त्यांना आम्ही बाणेदारपणाने उलट प्रश्न विचारीत असू. :
‘तुम्हाला काय वाटतं? काय व्हावं?’ यावर प्रश्नकर्त्याला तोंडदेखले हसून पुढे होण्यापलीकडे काही करता येत नसे. काही लहान मुले असतात आगाऊ! पण त्यांस सहन करणे क्रमप्राप्त असते. मागील मऊ भागी दोन सणसणीत चापट्या ठेवून द्याव्यात, अशा लहानग्यांचा गालगुच्चा घेण्याची पाळी येते. असो.
एका थोर नेत्यास याने की आमचे परमप्रिय साहेब यांना महान नेता होणे जमले. नक्कीच जमले. महाराष्ट्राचे नवनिर्माण यथावकाश जमेल न जमेल, पण नेता होणे काही चुकले नाही. कां की आमच्यासारखे एकनिष्ठ सैनिक त्यांच्या सेवेचे ठायी तत्पर उभेच आहेत. साहेबांच्या होनहार सुपुत्रांसही नेता होणे जमणारच नव्हे,
जमवून दाखवणार, असा विडाच आम्ही उचलला आहे. किंबहुना तीच आमची
महत्त्वाकांक्षा आहे. पुन्हा असो.
रायगड जिल्ह्यातील तालुका आहे कर्जत. तिथं अनेक थोरामोठ्यांची शेतघरे आहेत. शेते नाहीत, पण घरे आहेत! अशा ऐतिहासिक तालुक्यात आहे एक गाव, त्याचं नाव कोंदिवडे. तिथल्या रस्त्यांच्या दुरवस्थेची रीळ दोन-तीन शाळकरी मुलींनी तयार केली. छत्रीला माईक लावून धम्माल केली. समाजमाध्यमांवर या
रिळेनं धुमाकूळ घातला, आणि कुठल्याही पत्रकाराला जमले नाही, ते या ‘व्हायरल गर्ल्स’नी करुन दाखवले. सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. आता सरकारचा डोळा कुठे असतो, आणि झणझणीत अंजन कुठल्या दुकानात मिळते, असे फालतू प्रश्न विचारु नयेत! या मुलींनी केलेल्या पराक्रमाचे
कवतिक साहेबांनी करायचे ठरवले. त्यांनी हुकूम सोडला, ‘जा त्या मुलींना शिवतीर्थावर घेऊन या!’’ आम्ही त्वरेने सुटलो. मुलींना आणायला गाड्या रवाना झाल्या.
‘‘…आणि हो, शिवतीर्थावर त्या मुली आल्या की आम्हाला येऊन वर्दी द्या! त्या राष्ट्रकुल पदकविजेत्यासारखं करु नका! आम्हाला शिव्या खाव्या लागल्या..,’’ साहेबांनी आम्हाला बजावले. तीही चूक आमचीच होती. पुन्हा असो.
मुली आल्या, त्यांनी साहेबांना नमस्कार केला. साहेब कौतुकाने विचारते झाले, ‘‘काय गं मुलींनो, तुम्ही मोठेपणी रिपोर्टर होणार की काय?’’
आता हा सवालच मुळात विदारक स्वरूपाचा आहे. जाणतेपणी आयुष्यात कोण रिपोर्टर होतो बरे? कुठल्याही रिपोर्टरास विचारा, कुठल्याही संपादकास विचारा! दुसरे काही जमणे जमले नाही, म्हणून माणूस रिपोर्टर होतो, हे दाहक वास्तव साहेबांस कुठे माहीत असायला? जाऊ द्या!
‘‘छे, मी स्टेनो होणार!,’’ एक मुलगी. नेमस्त असावी.
‘‘मी यूट्यूबर होणार!,’’ दुसरी मुलगी. हे प्रकरण बरे आहे, हे नुकतेच तिला कळले असावे.
‘‘मी स्केच आर्टिस्ट होणार!,’’ तिसरी मुलगी. हिला कोणीतरी सांगून पाठवले असावे, असा आम्हाला संशय आला. कारण स्केच आर्टिस्ट म्हटले की आमचे साहेब हातचे भाषण बाजूला ठेवून कोरा कागुद आणि ब्रश-पेणसिली ओढतात.
त्यांनी तिजकडे कौतुकाने पाहियले. नंतर चटदिशी सुपुत्र अमूबाळ यांचेकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले, त्यांनी तत्क्षणी तिसरीकडेच मान फिरवली. असो, असो...
तिन्ही होनहार मुलींचे अभीष्ट चिंतून त्यांस अनेक प्रकारे आशीर्वाद देऊन साहेबांनी त्यांची रवानगी कोंदिवडे गावात केली. अनेक पत्रकार, टीव्हीवाहिन्यांचे प्रतिनिधी, क्यामेरामन आणि खुद्द क्यामेरे हा प्रसंग खजील
होऊन टिपत होते.
मोठेपणी तुम्ही कोण होणार? या प्रश्नाचे सोपे उत्तर ‘तुम्हीच सांगा, कोण होऊ?’ हा प्रतिप्रश्नच आहे. इत्यलम.
ब्रिटिश नंदी
………………………
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.