मायेची सावली
कृष्णाकाठच्या चिंचणेर (वंदन) या गावातील शेतकरी भाऊसाहेब हरी जाधव यांच्या कुटुंबात १९४२ मध्ये माझ्या आजी माणिकाबाई यांचा जन्म झाला. आम्ही तिला ‘आई’ म्हणत होतो. नऊ मुली आणि दोन मुले अशा मोठ्या परिवारातील ती चौथी अपत्य होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने शालेय शिक्षण मिळालं नाही; पण ज्ञानाची ओढ कायम राहिली. शाळेत न जाता तिने स्वतः वाचन-लेखन शिकून घेतलं.
अवघ्या अकराव्या वर्षी तिचा विवाह नवलेवाडी (ललगुण) येथील बाबासाहेब पवार यांच्याशी झाल्याने ती माणिकाबाई पवार झाली. मोठी सून म्हणून सासू-सासरे, तीन दीर, तीन नणंदा असा मोठा परिवार तिने प्रेमाने सांभाळला. पती मुंबई येथे रेल्वे सेवेत असल्याने संसार मुंबईत स्थिरावला. मर्यादित उत्पन्नात संसार उभा करताना अशोक, दिलीप आणि राजेंद्र या तिन्ही मुलांना शिक्षण, संस्कार आणि माणुसकीची शिकवण तिने दिली.
मुलांचे संसार मार्गी लागल्यानंतर अनेक वर्षे मुंबईत राहून तिने नातवंडांचा सांभाळ केला. तिला मुलगी नव्हती. १९९० मध्ये माझा जन्म झाला आणि मुलगी नसल्याची तिची खंतच जणू संपली. नात्याने मी तिची नात होते; पण तिच्यासाठी मी तिचीच मुलगी होते. तिने मला कधी स्वतःपासून दूर केलं नाही. आजी म्हणून नव्हे, तर आईच बनून तिने मला वाढवलं. माझ्यासाठी ती आयुष्यभर ढाल बनून उभी राहिली. माझ्या प्रत्येक दुःखात ती अस्वस्थ व्हायची आणि प्रत्येक आनंदात मनापासून हसायची. केवळ जन्म दिल्याने आई होता येत नाही, तर प्रेम, माया, त्याग आणि लेकरासाठी जगण्याने आईपण सिद्ध होतं, हे तिने तिच्या आयुष्यातून दाखवून दिलं.
ज्ञानेश्वरी, गुरूचरित्र, नवनाथ, हरिपाठ आणि पारायणे हे तिच्या जीवनाचा भाग होते. हरिपाठ तिला तोंडपाठ होता. माझ्याकडून हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी वाचून घ्यायची. व्यासपीठावर बसवून वाचन करायला लावायची. माझं अक्षर सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज माझ्या लेखनात तिचे संस्कार दिसतात. वारकरी संप्रदायाशी तिची घट्ट नाळ जुळली होती. पंढरपूरची माळ धारण करून तिने भागवत धर्माचा झेंडा हाती घेतला. सलग बारा वर्षे आषाढी पायी वारी केली. तात्यांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून वर्षभर ग्रंथवाचन केलं. भक्ती आणि सेवा हेच तिचं खरं वैभव होतं.
तीन नातवंडांची लग्न आणि परतवंडांचं आगमन तिने पाहिलं. १६ जून २०२६ ला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर ‘माउली... माउली’ म्हणत ती शांतपणे विठ्ठलाच्या चरणी लीन झाली. आई नेहमी म्हणायची, ‘‘सामान्य गोष्टी तर सगळेच करतात, काहीतरी वेगळं कर.’’ माझी पहिली कविता तिच्यावर होती. त्या पहिल्या कवितेपासून सुरू झालेला प्रवास आज कवितांच्या पुस्तकापर्यंत येऊन पोहोचला आहे; पण एक खंत कायम राहील, हे सगळं ती असताना करायचं होतं.
पुस्तकाची पहिली प्रत तिच्या हातात द्यायची होती. ‘‘ही माझ्या सुप्रियाची कविता आहे,’’ असं अभिमानाने म्हणताना तिला पाहायचं होतं. तिच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे कोलमडून गेले आहे. अजूनही हात थरथरतो, डोळे भरून येतात; पण आई, तू माझी काळजी करू नकोस. भाऊ, काका, संपूर्ण परिवार आणि माझी नणंद चित्रा माई माझ्यासोबत आहेत. माईंनी मला खूप सावरलं. त्यांनी मला समजून घेतलं आणि पुन्हा उभं राहण्याचं बळ दिलं. त्या म्हणतात, ‘‘सुप्रिया, थांबू नकोस. तुझं पुस्तक आपण नक्की प्रकाशित करू. तुझी आई तुझ्यासोबतच आहे. मी आणि माझं घर तुझं माहेर आहे.’’ अजूनही मनाला वाटतं, की तू कुठेतरी आहेस. अचानक हाक मारली, तर नेहमीसारखं ‘‘काय गं सुप्रिया?’’ असं म्हणत उत्तर देशील, असं वाटतं; पण मग वास्तव समोर उभं राहतं आणि डोळे भरून येतात. आज तुझ्या तेराव्याच्या दिवशी एकच वचन देते, हे पुस्तक नक्की प्रकाशित करेन. कारण ते फक्त पुस्तक नसेल, तर तुझ्या प्रेमाला, भक्तीला, त्यागाला आणि मायेच्या सावलीला वाहिलेली माझी शब्दांजली असेल.
२९२६४
सुप्रिया जाधव (नेले, सातारा)
-माझी आई
माणिकाबाई २९२६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.