सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३ ः महिला दिनाचे औचित्य साधून दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात सात व आठ मार्चला प्रशासनातील महिला मराठी अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन होणार आहे. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला या संमेलनाच्या निमंत्रक आहेत.
पुण्यातील सरहद, आणि महाराष्ट्र सदन प्रशासनातर्फे या अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत आर. विमला आणि ‘सरहद’चे सहसंयोजक लेशपाल यांनी मराठी महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाची माहिती दिली. प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे साहित्य संमेलन होणार असून महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षाचे औचित्य आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
संमेलनाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी लेफ्टनंट जनरल मा. माधुरी कानिटकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनात एकाच वेळी तीन समांतर सभागृहांमध्ये विविध कार्यक्रम होतील. सभागृह एकमध्ये सामाजिक व साहित्यिक परिसंवाद, चर्चासत्रे आणि मान्यवरांच्या मुलाखतीचे कार्यक्रम असतील. सभागृह दोनमध्ये निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होतील. सभागृह तीनमध्ये पुस्तक प्रकाशन, गझल सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.