वाल्हे, ता. ७ : दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणांच्या हंगामात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुलशेतीचे नियोजन केले होते. मात्र दसऱ्यानंतरही दिवाळीच्या ऐन सणात झेंडूच्या फुलांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
दसरा, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे या सणांच्या काळात फुलांना चांगला दर मिळेल या आशेने वाल्हे, दौंडज, पिंगोरी, पिसुर्टी आणि नीरा परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती. सध्या शेतांमध्ये फुलांची तोडणी सुरू असून दिवाळीच्या बाजारपेठेत चांगली उलाढाल होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात बाजारभावात अपेक्षित वाढ झालेली नाही.
सध्या झेंडूला प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळत असून वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
झेंडूचे पीक
घेण्यासाठी शेतकऱ्यांना रोपे, खते, औषधे, फवारणी, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च करावा लागतो. लागवडीपासून फुलतोडणीपर्यंत एकरी सुमारे ५० हजार
रुपयांचा खर्च येत आहे. त्यातच बदलत्या हवामानामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात आणखी भर पडत आहे.
अशा परिस्थितीत प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दराने फुलांची विक्री करावी लागत असल्याने उत्पादन खर्च भरून निघण्याचीही शाश्वती राहिलेली नाही.
तोडणी, वाहतुकीचा खर्चही निघणे
विशेष म्हणजे वर्षभर मेहनत करून दिवाळीच्या हंगामात दोन पैसे पदरात पडतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुलशेतीचे नियोजन केले होते. मात्र, सणाच्या मुख्य काळातच बाजारभाव घसरल्याने फुले तोडण्याचा आणि बाजारपेठेत पोहोचविण्याचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे दिवाळीचा हंगाम झेंडू उत्पादकांसाठी आर्थिकदृष्ट्या निराशाजनक ठरत असून फुलांच्या रंगाबरोबर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही फिका पडल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
दसरा आणि दिवाळीच्या सणात झेंडूला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने लागवड केली होती. मात्र दोन्ही सणांच्या काळातही प्रतिकिलो ४० ते ५० रुपयेच बाजारभाव मिळत आहे. एकरी जवळपास पन्नास हजार रुपये उत्पादन खर्च येत असून तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही परवडत नाही. त्यामुळे मेहनत आणि भांडवल गुंतवूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
- सुनील भुजबळ, शेतकरी, वाल्हे (माळवाडी)
08660
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.