पुणे, ता. २५ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेतील (मसाप) पदाधिकाऱ्यांमधील वाद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २७) होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांत संस्थेतील अंतर्गत मतभेद सार्वजनिक झाल्यानंतर प्रथमच सर्व पदाधिकारी या बैठकीच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. त्यामुळे बैठकीत हे मतभेद वाढणार की वाद संपवून ‘मनोमिलन’ होणार, याबाबत उत्सुकता आहे.
‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांमधील मतभेद, परस्परांविषयी व्यक्त झालेली नाराजी आणि नोटिसांच्या मुद्द्यावरून संस्थेतील अंतर्गत नाराजीचा मुद्दा ऐरणीवर आला. मसापचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले पत्र सार्वजनिक झाले. तसेच, जिल्हा प्रतिनिधींनी देखील पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी महाजन यांना पत्रातूनच प्रत्युत्तर दिले. नव्या कार्यकारिणीतील ही धुसफूस अवघ्या सहा महिन्यांतच चव्हाट्यावर आल्याने संस्थेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
या सगळ्या वादानंतर सर्व पदाधिकारी आता मंगळवारच्या बैठकीत प्रथमच एकत्र येणार आहेत. १४ ऑक्टोबरला नियोजित असणारी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलून त्यापूर्वी ही कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वार्षिक ताळेबंद आणि अंदाजपत्रकाला मंजुरी, गेल्या तीन महिन्यांत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये झालेल्या प्रस्तावांची माहिती व मंजुरी, चार उपाध्यक्षांची नेमणूक आणि स्वीकृत सदस्यांची नियुक्ती या विषयांवर चर्चा होणार आहे. ठाणे जिल्हा प्रमुखाच्या रिक्त पदावरील नियुक्तीचाही विषय विषयपत्रिकेत आहे. त्यामुळे संस्थेतील प्रशासकीय निर्णयांबरोबरच पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या दृष्टीने आणि नव्या नियुक्त्यांसाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीत नुकत्याच घडलेल्या वादांवर चर्चा होणार का, जिल्हा प्रमुखांच्या नाराजीवर चर्चा होणार का, तसेच संस्थेच्या कामकाजात समन्वय प्रस्थापित करण्यासाठी काही निर्णय घेतले जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
----
चार उपाध्यक्षांची नेमणूक
‘मसाप’च्या कार्यकारिणी बैठकीच्या विषय पत्रिकेत चार उपाध्यक्षांच्या नेमणुकीचा मुद्दा समाविष्ट आहे. त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची नेमणूक आणि ठाणे जिल्हाप्रमुखाच्या रिक्त पदावरील नियुक्तीबाबतही चर्चा होणार आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष पदासाठी अनेक व्यक्ती उत्सुक आहेत. त्यातील नेमक्या कोणाकोणाची निवड होणार, याचीही उत्सुकता असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.