भ्रमंती
मेघालयातील मॉन्सून मॅजिक
- सई गणेश कोरे
-----------------------------------------
लीड
लहानपणी शाळेत भूगोल शिकताना जगातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून चेरापुंजी या ठिकाणाची ओळख झाली. प्रत्येकाने कमी-अधिक प्रमाणात पाऊस अनुभवलेलाच असतो. महाराष्ट्रात माळशेज घाट, ताम्हिणी घाट, आंंबोली घाट हे सर्वाधिक पावसाचे प्रदेश म्हणून ओळखले जातात. मला शालेय वयापासूनच जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीचे आकर्षण होते. मनातील इच्छा पूर्ण होत मेघालयातील चेरापुंजीचा पाऊस व निसर्ग अनुभवण्याचा योग आला. या चिंब सफरीचा अनुभव...
-----------------------------------------
मेघालयामध्ये जाताना मनात उत्सुकता, हुरहुर आणि पावसाची भीती होती. किती पाऊस असेल, याचे मनात आडाखे बांधणे सुरू होते. आम्ही विमानाने पुण्यातून गुवाहाटीला पोहचलो. तेथून मॉफलाँग गावाकडे निघालो. गावात ७०० ते ८०० वर्षांपासून असलेले जंगल स्थानिकांनी चांगल्या प्रकारे जतन केले आहे. त्या जंगलाला ‘सॅक्रेड फॉरेस्ट’ असे म्हणतात. या लोकांसाठी हे जंगल देवासमान आहे. स्थानिकांच्या भावनेनुसार, देव आपल्यावर प्रसन्न असेल, तर जंगलात बिबट्यांचा वावर आढळून येतो. जर आपल्याकडून काही कमतरता राहिली असेल, तर देव सापाच्या रूपात दर्शन देत नाराजी व्यक्त करतो. मानवाने निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून त्याचा आदर केला पाहिजे, हे येथील लोकांनी ओळखले आहे. या जंगलामध्ये दिवसातील विशिष्ट वेळेतच जाता येते. त्या वेळेनंतर जंगलात जाण्यास प्रतिबंध आहे.
या जंगलात ४००पेक्षा जास्त ज्ञात वनस्पती व साधारण ४०० संशोधन न झालेल्या प्रजाती आढळतात. येथे सतत धुके पसरलेले असते. येथे उभ्या केलेल्या दगडांच्या रूपात मेघालयातील संस्कृती दर्शवण्यात आली आहे. तीन मोठे दगड घरातील पुरुषांना दर्शवतात. त्याच्यापुढे असलेला आडवा मोठा दगड घरातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व करतो. त्याखाली असलेले छोटे दगड लहान मुलांना दर्शवितात. मेघालयातील खासी संस्कृतीत स्त्री कुटुंबाची जबाबदारी पेलते. ही जबाबदारी पेलत असताना स्रियांना पुरुष संरक्षण देतात. म्हणून तेथील व्यवसाय स्त्रियाच सांभाळतात. हा परिसर आणि त्या परिसरातील ग्रामसंस्कृती पाहण्यात, अनुभवण्यात पहिला दिवस संपला.
दुसऱ्या दिवशी आम्ही मॉलिनाँग या गावाला भेट देली. या गावाला आशिया खंडातील सर्वाधिक स्वच्छ गाव म्हणून नावाजण्यात आले आहे. येथील स्वच्छता व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली आहे. गावातील पाळीव प्राण्यांसाठी गावापासून काही अंतरावर वेगळी जागा करण्यात आली, त्यामुळे गाव स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच, ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करणे या प्रक्रिया येथे शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्या जातात. आपले गाव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी त्यांची संस्कृती सांगते. स्वच्छतेचे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जातात आहे. या गावातून फेरफटका मारताना त्याचा जवळून अनुभव आला.
या गावाकडून चेरापुंजीकडे जाताना वाटेत मौसमाय गुहा बघायला मिळाल्या. मेघालयातील या गुहांचे वैशिष्ट्य म्हणजे या खोल व रुंद आहेत. भरपूर पावसामुळे तिथे असलेल्या चुनखडकाची झीज होऊन या गुहांची निर्मिती झाली आहे. तसेच, सततच्या पावसामुळे झिरपणाऱ्या झऱ्यामुळे क्षार साचून वरून खालच्या दिशेने येणारे लवणस्तंभ तयार झाले आहेत. खाली पडणाऱ्या पाण्यामुळे खालून वरच्या दिशेने (ऊर्ध्वमुखी) लवणस्तंभ तयार होतात. येथील अरवाह गुहांमध्ये तर जीवाश्मसुद्धा बघायला मिळतात.
तिसऱ्या दिवशी आम्ही भारतातील सातवा सर्वांत मोठा किनरम धबधबा बघायला गेलो. हा धबधबा साधारण एक हजार फूट उंचीवरून कोसळत असल्यामुळे या धबधब्याचे भर पावसाळ्यातील रौद्र रूप बघणे धडकी भरवणारे होते. धडकी भरणे या शब्दाच्या अर्थाचा अनुभव प्रत्यक्ष घेत, धबधब्याच्या तुषारांमध्ये भिजण्याचा आनंद घेतला.
चौथ्या दिवशी चेरापुंजीच्या भेटीचा दिवस उजाडला. चेरापुंजीचे स्थानिक नाव ‘सोहरा’ आहे. इंग्रजांनी ‘सोहरा’ या शब्दाचा अपभ्रंश करून ‘चेरा’ असे म्हणायला सुरुवात केली. पुंजी म्हणजे गावांचा समूह. यामुळे या गावांच्या समूहाला चेरापुंजी हे नाव मिळाले. चेरापुंजीमध्ये प्रचंड पाऊस असेल, असे वाटले होते. मात्र पावसाने आमची निराशा केली. आम्ही गेलो त्यावेळी पाऊस पाहिजे तसा नव्हता. पावसाचा जोर कमी असल्यामुळे आम्ही भारतीय हवामान विभागाला भेट दिली. तेथे पाऊस कसा मोजला जातो, याची माहिती मिळाली. यामध्ये प्रत्यक्ष जमिनीवरील पर्जन्यमापकाबरोबरच (रेन गेज) आधुनिक तंत्र असलेले प्लुव्हिओमेट्रिक तंत्र तसेच जपानी लेजर टेक्नॉलॉजीही बघायला मिळाली. तेथे १९७३पासूनचे मोजलेल्या पावसाच्या नोंदी आहेत. आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस २२ हजार ७६३ मिलिमीटर इतका नोंदला गेला आहे. सर्वात कमी पाऊस ७ हजार ४३ मिलिमीटर इतका पडला आहे! त्यानंतर आम्ही दुमजली डबल डेकर रूट ब्रिजचा ट्रेक केला. भोवती घनदाट जंगल व भव्य धबधबे असलेल्या निसर्गातून वाट काढत आम्ही सुमारे ३५०० पायऱ्या पादाक्रांत केल्या व डबल डेकर रूट ब्रिजवर पोहोचलो. हा पूल निसर्ग आणि मानव यांच्यातील समन्वयाचा उत्तम नमुना आहे. धबधब्यात भिजण्याचा व ब्रिजवरून चालण्याचा रोमांचकारी अनुभव घेत आम्ही ट्रेक पूर्ण केला.
पाचव्या दिवशी शिलाँगमधील डॉन बॉस्को म्युझियमला भेट दिली. या म्युझियममध्ये ईशान्य भारतातील संस्कृती, शेती, इतिहास, वेशभूषा यांचे अद्भुत प्रदर्शन मांडले आहे. तसेच ईशान्य भारतातील स्थानिकांनी बांबूपासून तयार केलेल्या कलाकुसरींची खास आठवण पर्यटकांना खरेदी करण्यासाठी सुव्हनिअर्स शॉप्ससुद्धा आहेत. या ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करत आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पाच दिवसांच्या भन्नाट अनुभवांची शिदोरी घेऊन आम्ही पुन्हा चेरापुंजीला रवाना झालो.
आपला देश विविधतेने नटलेला आहे. मेघालयाच्या भेटीत या विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव आला. वैविध्यपूर्ण निसर्ग व त्या निसर्गात रमलेल्या मानवी संस्कृती यांचा मेळ मेघालयात बघायला मिळाला. खासी टेकड्यांमधील खासी जमातीतील लोक, त्यांचे राहणीमान, पेहराव, खाद्यसंस्कृती हे सर्व जाणून घेताना ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ची प्रचिती आली. तेथील लोकांकडून साधेपणाची शिकवण मिळाली. जग कितीही मॉडर्न झाले, तरी आपल्या संस्कृतीशी, आपल्या संस्कारांशी एकनिष्ठ राहणे, आपले गाव आपली जबाबदारी आहे, असे मानून तेथील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आदरयुक्त राहणे या गोष्टी मनाला भावल्या... खूप काही शिकण्यास मिळाले. आई-वडील व इतर कुटुंबीयांशिवाय माझ्या एकटीची ही पहिलीच सोलो ट्रीप होती. त्यामुळे मला या सहलीतून आत्मनिर्भरता, शिस्त, जबाबदारी या गोष्टी शिकायला मिळाल्या. बहुढंगी अनुभवांमुळे ही सहल संस्मरणीय ठरली...
-------चौकट--------
लिव्हिंग रूट ब्रिज
मेघालयातील लिव्हिंग रूट ब्रिजेस प्रसिद्ध आहेत. हे पूल स्थानिकांनी तयार केले आहेत. वटवृक्षांच्या कुळातील रबराच्या झाडांची मुळे, पारंब्या कोवळी असतानाच एकमेकांमध्ये गुंफली जातात. बांबूने तयार केलेल्या साच्याचा आधार घेऊन हे पूल उभारले जातात. वर्षे सरत जातात, तशी मुळे भक्कम होत जातात आणि पूलही मजबूत होतात. एक पूल उभारायला साधारण ५० ते ६० वर्षांचा काळ लागतो.
---
लेखिका ...................................................................... आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.