पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील रेंजहिल्स कॉर्नर ते शनिवारवाडा दरम्यानच्या सुमारे साडेतीन- चार किलोमीटरच्या अंतराचे रिक्षाचे भाडे किती व्हावे... चक्क 184 रुपये. प्रवाशाने मीटरच्या वैधतेबाबत शंका उपस्थित केल्यावर अवघ्या तीस रुपयांत तडजोड करण्यात आली अन् रिक्षाचालक दुसरा प्रवासी शोधण्यासाठी पुढे गेला.... शहरातील अनेक रिक्षांमधील मीटर हे रिक्षापेक्षा वेगाने धावताना दिसत असताना, "तक्रार आलेली नाही' म्हणत "आरटीओ'चे पुणे कार्यालय त्याकडे काणाडोळा करीत आहे.
शहरातील अनेक रिक्षांच्या मीटरमध्ये "गडबड' असल्याची प्रवाशांची भावना आहे. ज्या ठिकाणी जाण्यासाठी एरवी पन्नास रुपये लागतात, त्या ठिकाणी अनेकदा 70-80 रुपये लागत आहेत. तर काही रिक्षांचे मीटर यापेक्षा अधिक, म्हणजे पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरासाठी दीडशे रुपयांहून अधिक भाडे आकारत असल्याचे प्रवाशांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. याबाबत विचारणा केल्यावर "प्रवाशांनी तक्रार केल्यावरच कारवाईचे बघू,' असे उत्तर, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी देत आहेत. रिक्षाच्या मीटरची अचानक तपासणी करण्याची त्यांच्याकडे यंत्रणाही नाही अन् इच्छाशक्तीही ! त्यामुळे फेरफार करणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या वाढत असून, त्याचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे अन् त्यामुळेच हे प्रवासी ओला, उबेरकडे वळत आहेत.
""काही दिवसांपूर्वी रेंज हिल ते शनिवारवाडा असा रिक्षाने प्रवास केला. त्या वेळी त्या रिक्षाचे बिल हे 184 रुपये झाले. हा आकडा आश्चर्यचकित करणारा असल्यामुळे त्या रिक्षाचालकाशी थोडी बाचाबाचीही झाली. या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने 30 द्या अन् प्रकरण मिटवा असे सांगितले.''
- अंगद तौर
""एसएनडीटी विद्यापीठ ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या अंतराचे रिक्षा भाडे 70 रुपयांच्या आसपास होते. पण एकदा या मार्गावरून प्रवास करताना त्या रिक्षाचे भाडे हे 140 रुपये झाले होते. यावर विचारणा केली तर "सोडले हेच उपकार माना' असे अरेरावीचे उत्तर रिक्षाचालकाने दिले.''
- प्रा. विजयकुमार भवारी
नवीन आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करता येतो. अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत. मीटरमध्ये फेरफार करणे हे चुकीचे आहे. हा प्रकार म्हणजे चोरी करण्यासारखा आहे. मीटरमध्ये फेरफार न होऊ देण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा माझा प्रश्न आहे.
- नितीन पवार, निमंत्रक, रिक्षा पंचायत,
रिक्षाची वार्षिक तपासणी होत असते; मात्र त्यानंतर मीटरमध्ये काही बदल केल्यास आम्ही काही करू शकत नाही. नागरिकांच्या तक्रारी आल्या तर संबंधित रिक्षांवर कारवाई केली जाईल.
- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.