जिल्ह्यात गतवर्षी आठ हजार हेक्टर क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली
‘प्रतिथेंब अधिक पीक’ योजनेला सोलापुरात प्रतिसाद; गत सहा वर्षांत ४२ हजार हेक्टर नव्याने सिंचनाखाली
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि शेती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ‘प्रतिथेंब अधिक पीक’ अभियानातून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात आठ हजार हेक्टर क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. तर गेल्या सहा वर्षांत एकूण ४२ हजार ८३९ हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आले आहे.
गत सहा वर्षांतील क्षेत्रामध्ये फळपिकाखालील सर्वाधिक १७ हजार ३७ हेक्टरचा समावेश असून, त्याखालोखाल ऊस पिकाखालील १३ हजार ३४३ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून आतापर्यंत ११ कोटी २६ लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात ३९ हजार ६३७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी प्रत्यक्ष सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या ३ हजार ७४५ शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले असून, ४ हजार २५२ शेतकऱ्यांच्या अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी आणखी सुमारे १५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
-----------------------
चौकट
ऊस पिकाला शेतकऱ्यांची पसंती
२०२५-२६ मध्ये जिल्ह्यात नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली आलेल्या क्षेत्रात ऊस पिकाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सुरू उसाखाली ५०५.०२ हेक्टर, तर आडसाली उसाखाली ३९५.८५ हेक्टर असे एकूण ९८७ हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. त्याखालोखाल डाळिंब पिकाखाली ४७०.१६ हेक्टर, कांदा पिकाखाली ३४७.६९ हेक्टर आणि केळी पिकाखाली २४७.८४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन आणि मजुरी बचत यामुळे शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाकडे वळत असल्याचे चित्र आहे.
----------------------
चौकट
११.३३ कोटींचे पूरक अनुदान
केंद्राच्या योजनेला पूरक म्हणून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यात ७ हजार १६२ शेतकऱ्यांना ११ कोटी ३३ लाख ५९ हजार रुपयांचे पूरक अनुदान वितरित करण्यात आले आहे. यामध्ये २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील प्रलंबित लाभार्थ्यांसह चालू वर्षातील लाभार्थ्यांचाही समावेश आहे.
-------------------------
योजनेवर एक दृष्टिक्षेप
लाभार्थी निवड : ३९,६३७
अपात्र अर्ज : २५,३६४
प्रक्रियेतील अर्ज : १४,२७३
पूर्वमंजुरी अर्ज : ८,५८०
मंजूर अनुदान : ८,००७
प्रक्रियेतील अनुदान : ४,२५२
अनुदान वाटप : ३,७४५
सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र : ८,००० हेक्टर
वितरित अनुदान : ११ कोटी २६ लाख ८२ हजार रुपये
-----------------------------
कोट
PNE26W15693
पाण्याची कार्यक्षमता वाढवून अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा. आता ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर लाभ दिला जात आहे. अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.