उत्तर लखीमपूर (आसाम), ता. १२ (पीटीआय) : आसाममधील मिचिंग समुदायाची सर्वोच्च विद्यार्थी संघटना असलेल्या ‘तकम मिचिंग पोरिन केबांग’ने (टीएमपीके) अरुणाचल प्रदेशातील कथित गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी अरुणाचल प्रदेशकडे जाणाऱ्या मार्गांवर बेमुदत रास्तारोको सुरू केला आहे. या गोळीबारात १२ आदिवासी जखमी झाल्याचा आरोप आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलकांनी आंतरराज्य सीमेवरील प्रवेशमार्गांवरील प्रमुख रस्ते रोखले. जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून धेमाजी जिल्ह्यातील आंतरराज्य सीमेवर अरुणाचल प्रदेशातील काही समाजकंटकांनी कथितरित्या केलेल्या गोळीबारात सोमवारी आसाममधील किमान १२ जण जखमी झाले होते.
‘टीएमपीके’चे सचिव सान पांगिंग म्हणाले, ‘‘आंतरराज्य सीमेवर अशा घटना नवीन नाहीत; मात्र आमच्या सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. यावेळी सर्व आरोपींना अटक करून आसाम पोलिसांच्या ताब्यात देईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील.’’
‘टीएमपीके’सोबतच मिचिंग मिमाग केबांग (एमएमके) आणि ताकम मिचिंग महिला केबांग (टीएमएमके) या स्थानिक सामाजिक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या संघटनांनी प्रवेशमार्गांवर अरुणाचल प्रदेशातील नोंदणी क्रमांक असलेली सर्व वाहने अडवली.
आसाम-अरुणाचल प्रदेश सीमावाद लवकर सोडवावा, दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारातील समाजकंटकांवर कारवाई करावी आणि आसामच्या जमिनीवरील कथित अतिक्रमण थांबवावे, अशा मागण्या या संघटनांनी केल्या आहेत.
१० ऑगस्टला आसाम-अरुणाचल प्रदेश सीमेवरील गेरुकामुख पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोगामुख महसूल मंडळातील मिंगमांग वस्ती येथे गोळीबाराची घटना घडली होती. आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील जमिनीवर अरुणाचल प्रदेशातील नागरिकांनी कथित अतिक्रमण केल्याच्या वादातून हा संघर्ष झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.