शेतीमाल मूल्यवर्धनासाठी
अत्याधुनिक सुविधांवर भर
पणनमंत्री रावल ः विकासासाठी समित्यांना ५ कोटी ४० लाखांचे कर्ज
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : पणन मंडळाने शेतीमाल मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधांची निर्मिती करण्यावर भर द्यावा. त्यासाठी नवीन योजना सुरू करण्याचे नियोजन करावे. नवीन गोदामे, शीतगृहे, विकिरण केंद्रांची निर्मिती आणि निर्यात सुविधा केंद्रांचे अत्याधुनिकीकरण करून त्यांची क्षमता दुपटीने वाढवावी, अशा सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.
राज्य कृषी पणन मंडळाच्या आढावा बैठकीत मंत्री रावल बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती अंकुश अहिरे, संचालक संजय काजळे, संचालक तुळशीदास रावराणे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, पणन संचालक आणि राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक शिरीश कुलकर्णी, डॉ. अमोल यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रावल म्हणाले, ‘‘शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांना उत्पादनाचा अधिक चांगला दर मिळेल. यासाठी गोदामे, कोल्ड स्टोअरेज, प्रक्रिया केंद्रे आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. शेतीमालाचे योग्य व्यवस्थापन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, तसेच साठवणूक क्षमता वाढविणे व शीतगृहांची निर्मिती यांवर अधिक भर देऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देणारी सक्षम व्यवस्था उभी करावी.’’
राज्यातील बाजार समित्यांचा ‘मॉडेल मार्केट’च्या धर्तीवर विकास करण्यासाठी नियोजन करावे. पणन मंडळाने शेतीमालाची मूल्यसाखळी बळकट करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा. यासाठी स्वतंत्र योजना राबविण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करावा, असेही रावल यांनी सांगितले.
प्रक्रिया प्रकल्पांसाठी बाजार समित्यांना अनुदान
बाजार समित्यांनी प्रक्रिया प्रकल्पांसाठी स्वतःची जागा उपलब्ध करून दिल्यास राज्य कृषी पणन मंडळामार्फत अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री रावल यांनी दिली. शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा. आवश्यक जागा उपलब्ध झाल्यास खासगी उद्योजकांच्या सहभागातून कांदा निर्जलीकरणासह अन्य प्रक्रिया प्रकल्प उभारणे शक्य होईल. यामुळे शेतीमालाला अधिक मूल्य मिळण्यास आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असेही रावल यांनी या वेळी सांगितले.
फोटो ओळ
पुणे : राज्य कृषी पणन मंडळाच्या बैठकीत बोलताना पणनमंत्री जयकुमार रावल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.