श्रावण महिना म्हणजे निसर्गाच्या हिरवाईने नटलेला, भक्तिभावाने ओथंबलेला आणि सणांच्या आगमनाची चाहूल देणारा काळ. श्रावण संपताच गणेशोत्सवाची लगबग सुरू होते आणि त्यानंतर नवरात्राच्या रंगीबेरंगी उत्सवाला प्रारंभ होतो. पूर्वी या सणांचे स्वरूप मुख्यतः धार्मिक विधी, परंपरा आणि कुटुंबकेंद्री सहभागापुरते मर्यादित होते. मात्र आजच्या काळात या सणांना आधुनिक विचारांची पालवी फुटली आहे. विशेषतः महिलांचा वाढता सहभाग हा या परिवर्तनाचा महत्त्वाचा भाग ठरत आहे.
- ॲड. प्रतिभा देवी
आजची महिला केवळ घरातील पूजाविधी करणारी किंवा सणाची तयारी करणारी व्यक्ती राहिलेली नाही. ती सणांचे नियोजन करते, आर्थिक व्यवस्थापन करते, सामाजिक उपक्रम राबवते, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेतृत्व करते आणि उत्सवाला समाजोपयोगी स्वरूप देते. त्यामुळे सण आता केवळ श्रद्धेचे माध्यम न राहता सामाजिक परिवर्तनाचे व्यासपीठ बनू लागले आहेत.
हरितालिका व्रत
गणरायाचे आगमन होण्याआधी हरितालिकेचे व्रत केले जाते. हरितालिका म्हटले की डोळ्यांसमोर येते ती गौरी-शंकराची सुंदर प्रतिमा, हिरव्यागार साड्या, हातातील हिरव्या बांगड्या, मेंदीचा सुगंध, सख्यांच्या गप्पांची मैफील आणि श्रद्धेने केले जाणारे व्रत. काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि महिलांच्या आयुष्याची व्याख्याही बदलली. त्यामुळे आजची हरितालिका केवळ उपवास, पूजा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेले व्रत न राहता महिलेच्या आत्मविश्वासाचा, नात्यांमधील समानतेचा आणि निसर्गाशी नातं जपण्याचा उत्सव बनू शकते. पार्वती देवीची पूजा करताना निसर्गाची पूजा करणे हीच आधुनिक हरितालिकेची खरी ओळख आहे.
आजची मुलगी शिक्षण घेते, करिअर करते, व्यवसाय सांभाळते, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारते आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करते. तिच्या हरितालिका व्रताचा अर्थही वेगळा झाला आहे. ‘मला चांगला पती मिळावा’ एवढ्यापुरती तिची स्वप्ने मर्यादित नाहीत. तिची प्रार्थना अशी असू शकते, ‘मला माझी स्वप्ने ओळखण्याचे धैर्य दे, ती पूर्ण करण्याची शक्ती दे आणि माझ्या आयुष्यातील नाती प्रेम, आदर आणि समानतेने फुलू दे.’ हरितालिकेचा आधुनिक अर्थ म्हणजे वैवाहिक नात्याचे पुनर्मूल्यांकन. केवळ पत्नीने पतीसाठी व्रत करण्यापेक्षा पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करणे अधिक सुंदर नाही का?
आजच्या काळात संसार हा दोघांच्या सहभागाने चालतो. घरकाम, मुलांचे संगोपन, आर्थिक नियोजन, वृद्धांची काळजी या सगळ्या जबाबदाऱ्या परस्पर सहकार्याने पार पडतात. म्हणून आधुनिक हरितालिका ‘मी तुझ्यासाठी’ पासून ‘आपण एकमेकांसाठी’ या प्रवासाची खूण ठरू शकते.
गणेशोत्सवाचे काटेकोर नियोजन
गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याचा क्षण. पूर्वी गणेशोत्सवात सजावट, आरती, प्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व होते. आज त्यात पर्यावरणपूरकतेची भर पडली आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, पुनर्वापर करता येणारी सजावट, निर्माल्य व्यवस्थापन आणि कृत्रिम फुलांऐवजी स्थानिक साहित्याच्या वापराबाबत महिलांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. महिलांची ढोल पथके आहेत आणि ती महिलांना आरोग्य आणि व्यायाम किती महत्त्वाचा आहे ते दर्शवितात.
अनेक महिला मंडळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता असे उपक्रम राबवत आहेत. गणपतीच्या आरतीबरोबरच समाजजागृतीची ज्योतही प्रज्वलित होत आहे. गणेशोत्सवाच्या आयोजनात महिलांचे आर्थिक नियोजनही महत्त्वाचे ठरत आहे. वर्गणी किती, खर्च किती, सजावटीसाठी किती तरतूद, सामाजिक उपक्रमांसाठी किती निधी या सर्व बाबींचे नियोजन महिलांकडून काटेकोरपणे केले जाते. उत्सवाच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीचा संदेशही दिला जातो.
नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर
नवरात्र हा देवीच्या शक्तीचा उत्सव. परंतु आज या उत्सवाचा अर्थ अधिक व्यापक झाला आहे. देवीची पूजा करताना समाजातील महिलेच्या सामर्थ्याची जाणीवही अधोरेखित केली जात आहे. देवीने असुरांचा संहार केला, तसे आजच्या काळातील नराधमांशी लढण्यासाठी कराटे, ज्युडो, मार्शल आर्टसारखे प्रकार आजच्या मुली शिकत आहेत.
गरबा, दांडिया, भोंडला, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच महिला बचत गटांचे प्रदर्शन, महिला उद्योजिकांच्या वस्तूंची विक्री, स्वयंरोजगार प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे आणि महिला सुरक्षा यांसारखे उपक्रम नवरात्रात आयोजित केले जातात. त्यामुळे ‘देवीची पूजा’ ही केवळ मंदिरातील किंवा घरातील पूजा न राहता ‘स्त्रीशक्तीचा सन्मान’ बनत आहे.
अनेक महिला आज स्वतःचा व्यवसाय चालवतात. घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला, दागिने, कपडे, सजावटीच्या वस्तू, पर्यावरणपूरक उत्पादने अशा अनेक गोष्टींची विक्री त्या सणांच्या काळात करतात. सण त्यांच्यासाठी आनंदाचा तर असतोच; परंतु तो आर्थिक स्वावलंबनाची संधीही ठरतो.
नव्या पिढीला संस्कारांची नवी भाषा
आजच्या मुलांना सणांचा धार्मिक इतिहास माहिती असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यामागील सामाजिक संदेश समजणेही आवश्यक आहे. गणपती म्हणजे बुद्धी आणि विवेक; नवरात्र म्हणजे शक्ती आणि महिलांचा सन्मान; श्रावण म्हणजे निसर्गाशी नाते. अशा व्यापक अर्थाने सण मुलांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. ही कामे आज महिला करत आहेत. महिलांची भूमिका येथे महत्त्वाची आहे. त्या मुलांना केवळ पूजा कशी करायची हे शिकवत नाहीत, तर पर्यावरणाचे महत्त्व, पैशाची किंमत, श्रमाचा सन्मान, समानता आणि सामाजिक जबाबदारी यांचेही संस्कार देऊ शकतात. श्रावणातून गणेशोत्सवाकडे आणि गणेशोत्सवातून नवरात्राकडे जाताना आपल्या सणांची वाटचाल केवळ कॅलेंडरवर होत नाही; ती विचारांच्या परिवर्तनाचीही वाटचाल आहे. भक्तीला विवेकाची, परंपरेला आधुनिकतेची, उत्सवाला सामाजिक बांधिलकीची आणि आनंदाला आर्थिक शिस्तीची जोड मिळत आहे.
या परिवर्तनात महिलांचा सहभाग हा सर्वांत आशादायी पैलू आहे. घर, संसार सांभाळणारी, अर्थव्यवस्थेचे नियोजन करणारी, व्यवसाय उभारणारी, समाजकार्य करणारी आणि उत्सवाचे नेतृत्व करणारी महिला सणांच्या केंद्रस्थानी आली आहे.
म्हणूनच श्रावणानंतर येणारा गणेशोत्सव आणि नवरात्र हे केवळ सण नसून नव्या विचारांची पालवी फुलविणारे पर्व ठरू शकतात. देवघरातील दिव्याबरोबर समाजमनातही सुविचारांचा दीप पेटला, परंपरेबरोबर परिवर्तनाची पावले पडली आणि महिलांच्या सहभागातून उत्सवाला नवी दिशा मिळाली, तरच सणांचा खरा अर्थ साकार होईल.
सण साजरे करूया; मनापासून, पर्यावरणपूरक पद्धतीने आणि महिलाशक्तीला सोबत घेऊन! प्रत्येक सणादिवशी किंवा रोजच देवासमोर हात जोडताना प्रत्येक महिलेने स्वतःसाठीही एक प्रार्थना करावी,
मला माझी स्वप्ने साकार करण्याचे बळ दे,
माझ्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याचे धैर्य दे,
माझ्या नात्यांमध्ये प्रेम आणि समानता दे,
आणि माझ्या आयुष्याला हिरवाईसारखी समृद्धी दे.
उत्सवातून आर्थिक स्वावलंबनाकडे...
१) सण आणि अर्थव्यवस्था यांचा संबंध अतूट आहे. सणांच्या काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. यात महिलांचा सहभाग वाढणे हा विशेष सकारात्मक बदल आहे.
२) घरातून छोटा व्यवसाय करणाऱ्या महिलांना गणेशोत्सव आणि नवरात्रासारख्या सणांमुळे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते.
३) सोशल मीडिया, ऑनलाइन विक्री आणि डिजिटल पेमेंटमुळे या संधी अधिक व्यापक झाल्या आहेत.
४) पूर्वी शेजारच्या चार घरांपुरता व्यवसाय मर्यादित असणारी महिला आज संपूर्ण शहरात किंवा देशभरात आपली उत्पादने विकू शकते. यामुळे सण हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे माध्यम ठरू शकतात.
५) उत्पन्नाबरोबर खर्चाचे नियोजन, नफा-तोट्याचा हिशेब, डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता आणि करविषयक प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. ते स्त्रीशिक्षणामुळे शक्य झाले आहे.