लष्करी संघर्षातून तोडगा नाही
पंतप्रधान मोदी; स्टब यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ५ ः ‘‘नियम-कायदे, संवाद आणि कूटनीती हाच संघर्षावर मार्ग काढण्याचा योग्य रस्ता आहे. प्रत्येक मुद्द्यावर लष्करी संघर्षातून तोडगा निघू शकत नाही,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फिनलॅंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना केले. रायसीना डायलॉग कार्यक्रमानिमित्त स्टब हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
जुन्या वैश्विक संस्थांमध्ये लवकरात लवकर सुधारणा होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. ‘‘युक्रेन असो अथवा पश्चिम आशिया दोन्ही ठिकाणी सैन्य संघर्षामुळे मार्ग निघणार नाही. संघर्षाचा शेवट आणि शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे आम्ही समर्थन करत राहू. दहशतवादाचा मुळापासून खातमा करण्यासाठी भारत आणि फिनलॅंड कटिबद्ध आहेत. उभय देशांतले संबंध वृद्धिंगत होत आहेत. ‘एआय’ पासून ते ६-जी दूरसंचारपर्यंत, स्वच्छ ऊर्जेपासून ते क्वांटम कम्युटिंगपर्यंत तर उच्च तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे काम करीत आहेत,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत-युरोप संबंध सुवर्ण युगात
‘‘सध्याच्या अस्थिरतेच्या काळात भारत आणि युरोप यांच्यातले संबंध सुवर्ण युगात प्रवेश करत आहेत. युरोपीय महासंघासोबत गत जानेवारी महिन्यात झालेला व्यापार करार हे त्याचे द्योतक आहे. वैश्विक स्थिरता, विकास आणि समृद्धीला भारत-युरोपीय देश नवी शक्ती देत आहेत,’’ असेही मोदी म्हणाले. तर, धोरणात्मक सहयोग आणि सहकार्य आणखी व्यापक करणे आवश्यक असल्याचे फिनलॅंडचे अध्यक्ष स्टब यांनी नमूद केले. ‘‘उभय देशांतील करारांमुळे द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर जातील,’’ असा विश्वास स्टब यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.