मोरगाव, ता. १२ : परिसरात वाढत्या दरोड्यांच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. शेरेवाडीतील दुहेरी हत्याकांडानंतरही चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी (ता. ९) युवकाच्या सतर्कतेमुळे दरोडा टळला असून, नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्याची आणि ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्याची मागणी केली आहे.
शेरेवाडी येथे सोन्याच्या हव्यासापोटी अंगणात झोपलेल्या दोन वृद्ध महिलांचा गळा चिरून खून केल्याची घटना ताजी असतानाच, परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. सोमवारी (ता. ५) एकाच रात्री मोरगावात पाच ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न झाला, ज्यात एका ठिकाणी चोरी झाली.
त्यानंतर शुक्रवारी (ता. ९) रात्री दीडच्या सुमारास पुन्हा एका घराची खिडकी शस्त्रांनी कापण्याचा प्रयत्न ६ ते ७ जणांच्या टोळीने केला. घरातील एका युवकाने हा प्रकार पाहून तातडीने मोबाइलद्वारे शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजारी धावून येताच टोळक्याने जवळच्या उसाच्या शेतात पळ काढला. या युवकांनी पहाटे चारपर्यंत टोळीचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
या घटनांमुळे नागरिक रात्री घराबाहेर पडण्यासही धजावत नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे युवकांच्या सहभागातून ग्रामसुरक्षा दल तयार करून त्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी नागरिकांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्याचे, सेफ्टी डोअर वापरण्याचे आणि अनोळखी व्यक्तींविषयी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्रामपंचायतींनी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असेही सुचवले आहे.
सुपे पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली जाते. मात्र, ग्रामसुरक्षा दल सक्रिय केले जाईल. नवीन युवकांना समाविष्ट करून घेतले जाईल. पूर्वीच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले आहे, तरीही पुन्हा बैठक घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या सूचना दिल्या जातील.
- शशिकांत शेळके, सहाय्यक निरीक्षक, सुपे पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.