पुणे

समीर गायकवाड लेख-पान १४

CD

पान १४
समीर गायकवाड लेख

उसवलेल्या नात्यांची वीण
----------------
समीर गायकवाड
-----------------
घटना कालपरवाचीच आहे. एका भोळसर निष्पाप गावंढळ स्त्रीची नि शहराचं वारं लागलेल्या तिच्या तरुण पोरीची ही हकीकत. सोलापूर एसटी स्टँड परिसरात घडलेली. त्या दोघी दृष्टीस पडल्या तो प्रहर दुपारचा होता. माथ्यावर टळटळीत कडक ऊन होते नि वाऱ्याचा मागमूस नव्हता. झाडाचे पानदेखील हलत नव्हते. आजूबाजूला चिक्कार गर्दी होती. गर्दीच्या मधोमध ती पोक्तवयीन स्त्री तिच्या मुलीशेजारी उभी होती. एकंदर देहबोलीवरून आणि बोलाचालीवरून ती स्त्री बहुधा अल्पशिक्षित वा अशिक्षित असावी असा अंदाज होता. तिचे कपडे काहीसे गबाळे, ओल्ड फॅशन्ड होते. काठा पदराची नववार साडी आणि विजोड पोलकं तिने नेसलं होतं. तिचा मूळचा सावळा रंग कष्ट करून अधिकच रापलेला होता, चेहऱ्यावर कष्टाचे कवडसे स्पष्ट दिसत होते. तिच्या भाळी असणारी आठ्यांची जाळी सांगत होती, की आयुष्यात तिने खूप श्रम केले आहेत. तिच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत होती, हातात प्लॅस्टिकच्या किंवा बहुतेक करून कचकड्याच्या चारेक बांगड्या होत्या. बहुसंख्य कचरावेचक महिला घालतात तशा रबरी चपला तिच्या पायात होत्या. अतिवापरामुळे त्या एका बाजूला घासून घासून सपई झाल्या होत्या. तिच्या हातात कापडी पिशवी होती आणि जवळच असणारी कापडी बॅगही बहुतेक तिचीच होती.
तिच्यापासून काही फूट अंतरावर एक तरुण मुलगी उभी होती. बऱ्यापैकी टापटीप आवरलेले. चेहऱ्याचा रखरखावही उत्तम होता. कपडेही चांगले नेटके होते. तिच्या पाठीवर बॅकसॅक होती. पायात स्पोर्ट शूज होते. मुलगी बहुत करून कॉलेज कन्यका वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची अधीरता आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. ती प्रौढ स्त्री तिला मधूनच हाक मारायची तेव्हा तिचा चेहरा चिडका वाटायचा, तिची देहबोलीही चिडखोर वाटायची. काही वेळाने ती प्रौढा त्या मुलीच्या जवळ गेली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलू लागली त्यासरशी त्या मुलीने फणकाऱ्याने तिचा हात झटकला. डोळे वटारत ती आणखी दूर जाऊन उभी राहिली. तिने असे सर्वांच्या देखता झिडकारून लावल्याने प्रौढ स्त्रीचे डोळे एव्हाना पाण्याने डबडबून गेले होते. ती मुलगी तिचा राग राग करत होती हे स्पष्टपणे जाणवत होतं. त्या प्रौढ स्त्रीला तिच्याजवळ जायचे होते वा त्या मुलीने आपल्याजवळ यावे इतकेच तिला वाटत होते. बहुतेक बऱ्याच दिवसांनंतर ते भेटत असावेत नि त्यांच्या गावाकडे निघाले असावेत. मुलगी बहुतेक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असावी अन् सोबतची स्त्री तिला हॉस्टेलवरून सोबत घेऊन सणासुदीच्या निमित्ताने गावाकडे निघाली असावी. मात्र त्या दोघींची अनबन असावी! मुलीने इतक्या अपमानास्पद पद्धतीने झिडकारल्यानंतरही त्या बिचारीचे मन त्या मुलीकडेच ओढ घेत होते. तरीही ती मुलगी त्या स्त्रीला जवळ येऊ देत नव्हती. त्यामुळे मुलीने हाकलून लावताच ती पुन्हा बाकावर येऊन बसली. मुलगी अगदी आतुरतेने एसटीची वाट पाहत होती आणि त्या स्त्रीला प्रतीक्षा होती तिने जवळ येण्याची.
एसटी स्टॅण्डवर फारशी गर्दी नव्हती. तरीही त्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या बहुतेक लोकांना त्या दोघींचे काहीतरी बिनसले आहे याची जाणीव झाली होती. ती प्रौढा सर्वांची नजर चुकवून रडत होती. साडीच्या जुनेर पदराने डोळे पुसत होती. दरम्यान, तिच्यापासून काही अंतरावर बसलेल्या एका वयस्क आज्जीबाईंच्या नजरेतून या गोष्टी सुटल्या नाहीत. न राहवून आज्जीबाई जागेवरून उठल्या आणि कंबरेत वाकत चालत पुढे निघाल्या. जाणिवपूर्वक हातून खाली पाडलेली चावी उचलण्याच्या बहाण्याने आज्जीबाई त्या प्रौढेपाशी जाऊन बसल्या. कुणाच्याही ध्यानात येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी तिच्या गालावरून हात फिरवला त्याबरोबर तिच्या भावना अनावर झाल्या. आज्जीबाईंच्या गळ्यात पडून ती मूक अश्रू ढाळू लागली. आज्जीने तिच्या नातवाला हाक मारून पाण्याची बाटली मागवली नि त्या प्रौढेस दिली. आज्जी दिसायला अगदी ओजस्वी होत्या. म्हातारपणाच्या रुपेरी खुणा केसांवर नांदत होत्या. कपाळ मोकळं असलं तरी सुरकुत्यांचे जाळे अजून पुरते जमा झाले नव्हते. गाल मात्र काहीसे ओघळले होते. हनुवटी लोंबत होती. जाडसर कानाच्या पाळ्या चालताना डुलत होत्या. स्वच्छ नीटनेटके आवरून खादीसारख्या जाड्याभरड्या धाग्यांची साडी नेसलेल्या आज्जी विलक्षण करारी वाटत होत्या. बऱ्याच वेळापासून या दोघींकडे त्यांचे लक्ष होते. ती मुलगी त्या बाईशी तुसडेपणाने वागत होती हे बहुधा त्यांना खूपच खटकले होते त्यामुळेच मोठ्या तळमळीने स्वतः होऊन त्या प्रौढ स्त्रीजवळ बसल्या होत्या.
दरम्यान, चोरट्या नजरेने ती मुलगी हे सर्व पाहत होती. एसटी येण्याची घोषणा झाली, मुलीच्या चेहऱ्यावर आनंद प्रसवला. परंतु ती प्रौढ स्त्री मात्र घायकुतीला आल्यासारखी वाटत होती. कारण आता तरी त्या मुलीला आपल्याशी नीट बोलावेच लागेल असे तिला मनोमन वाटत असावे. तिची व्याकुळता पाहून आज्जीबाईंना राहवले नाही. दुटांगी नेसलेल्या लुगड्याचा कासोटा उभ्यानेच आवळून धरत त्या पुढे गेल्या आणि तावातावाने त्या मुलीशी बोलू लागल्या. बसगाड्यांचा आवाज आणि माइकवरील अनाउन्समेंटचा आवाज वाढल्याने त्यांचा संवाद कुणालाच कळत नव्हता, मात्र बऱ्याच जणांचे कान त्यांच्याकडे होते. रागाने थरथरणाऱ्या आज्जी हातवारे करून जोरात बोलत होत्या नि ती मुलगी खाली मान घालून उभी होती. नंतर मात्र मुलीच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली. ती त्या प्रौढेपाशी गेली नि तिच्या गळ्यात पडून रडू लागली. इतक्यात त्यांची बस आली. आज्जीबाईंनी दोघींच्या पाठीवरून हात फिरवत गाडीच्या दारापाशी नेले. हसतमुखाने त्यांना निरोप देऊन आज्जीबाई आपल्या जागेवर येऊन बसल्या देखील! दरम्यान काहींनी आज्जीच्या कानी लागण्याचा प्रयत्न केला, आज्जीबाईंनी त्यांना हुसकावून लावले. लोकांच्या भानगडीत तुम्हाला कशाला नाक खुपसायचेय असा प्रश्न केला.
काही वेळ गेला. बऱ्याच एसटी बसेस येऊन गेल्या. जुनी किरकोळ गर्दी निघून गेली आणि नवी बक्कळ गर्दी जमा झाली. आज्जींची एसटी लेट झाली होती. बऱ्याच वेळापासून मी त्यांच्याकडे पाहतोय हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खुणेनेच मला बोलवले नि त्यांच्या एसटीची चौकशी करण्याच्या निमित्ताने बोलत्या झाल्या. मग हळूच मघाच्या घटनेविषयी त्या बोलल्या. बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. काही वेळापूर्वी त्यांनी संयमाने आपले अश्रू रोखून धरले होते, आता त्यांना वाट करून दिली. ती प्रौढ स्त्री त्या मुलीची आई होती. मुलगी कॉलेजवर हॉस्टेलला राहते. नेहमी ती ये-जा करते, या वेळेस तिच्या वडिलांनी जाणीवपूर्वक तिच्या आईला तिला न्यायला पाठवले होते. आपल्या गबाळ्या अशिक्षित भोळसर आईची तिला लाज वाटत होती नि त्यामुळे ती सारखी हिडीसफिडीस करत होती. आपण जिला रक्ताचे पाणी करून मोठे केले ती आपला रागराग करते याचे विलक्षण दुःख त्या माउलीला झाले होते. किंबहुना, त्या मुलीकडे तिचे खेडूत वडील आले तरी ती त्यांच्याशीही अशीच वागायची, तिचे वागणे कळावे म्हणूनच या खेपेला त्यांनी बायकोला पाठवले होते. मुलीला आपल्या गरिबीची, खेडूत आईबापाची नि कथित मागासलेपणाची लाज वाटते या दुःखाने ती आई व्याकूळ झाली होती. दुरूनच हे आज्जीबाईंनी अचूक ओळखले होते. त्यांना राहवले नाही. त्यांनी त्या मुलीला खडे बोल सुनावत कडवट सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली.
त्या आज्जीबाई साध्यासुध्या नव्हत्या, त्या देखील खेड्यातल्याच होत्या. त्यांचे राहणीमानही कमीअधिक प्रमाणात त्या प्रौढ स्त्रीसारखेच होते. मात्र आज्जींनी त्या मुलीशी बोलताना याचा आवर्जून उल्लेख केला, की त्यांचा मुलगा डेप्युटी कलेक्टर आहे. आज्जीबाई आमच्या सोलापूर जिल्ह्यातील उपळाई गावच्या होत्या. त्यांच्या बोलण्या-चालण्यावरून मात्र त्या कुण्या अधिकारी पदावरील व्यक्तीच्या मातुःश्री असतील असे अजिबात वाटत नव्हते. आज्जीबाईंनी त्या मुलीची कानउघाडणी केली तेव्हा तिला आपली चूक कळली आणि आपल्या आईच्या कुशीत जाऊन ती रडू लागली. असा तो प्रसंग होता. त्या क्षणी त्या आज्जीबाईंचे पाय धरण्यासाठी वाकलो तर त्यांनी छातीशी धरले. फार दिवसांनी आईची ऊब अनुभवली.
‘आपल्या आईवडिलांचा दुःस्वास करणारी अपत्ये वठणीवर आणली पाहिजेत’, असं सांगताना त्यांचा कंठ भरून आला होता. त्यांचे भेगाळलेले खडबडीत हात सांगत होते, की त्यांनी अफाट खस्ता खाल्ल्या होत्या नि काबाडकष्ट केले होते. काहींचे जगणे अनेकांच्या जीवनाला नवा अर्थ देते. अगदी घुसमटलेली रक्ताची नाती देखील पूर्ववत करण्याची क्षमता त्यांच्या वाणीत असते. नाती रसरशीत ठेवता येतात, मात्र त्यासाठीची ऊर्मी काळजातून यावी लागते, मग ती कधी कधी इतरांच्या सुनावण्यातून येते तर कधी आत्मचिंतनातून येते!
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs BAN 2nd Test: बांगलादेशच्या ६४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक; Shoriful Islam च्या सहा बळींनी फिरली मॅच, पहिल्याच दिवशी १८ विकेट्स Video

Vishakha Raut: विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपद संकटात; शिवसेना ठाकरे गटाला धक्का

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोण करत आहे, हेही तरुणांना चांगले समजतय : विजय वडेट्टीवार

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’बाबत आमदारांनी भूमिका जाहीर करावी; आमदार जयंत पाटील यांचे आव्हान; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

Kaas Plateau Flower Festival : पर्यटकांसाठी खूशखबर! 1 सप्टेंबरपासून कास पठारावर फुलोत्सव; निसर्गाचा नवा अनुभव अन् आकर्षक पॉईंट्स सज्ज

SCROLL FOR NEXT