रावेत, ता. ३० : कारने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवकाला कायमस्वरुपी अपंगत्व आले. हा अपघात देहू-आळंदी रस्त्यावर १३ ऑक्टोबर २०२०च्या रात्री झाला होता. या युवकास १७ लाख रुपयांची भरपाई देण्याचा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
राजेश भगत (वय १९) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या अपघातानंतर राजेश यांनी पाच लाखांच्या भरपाईसाठी ॲड. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यामार्फत पुण्यातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरण सदस्य बी. जी. क्षीरसागर यांनी जखमीचे कायमस्वरुपी अपंगत्व, उपचार खर्च, इतर नुकसान तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक निर्णयांचा विचार केला. तसेच जखमीचा दरमहा उत्पन्न १५ हजार रुपये धरून सर्व बाबी ग्राह्य मानत १७ लाखांची भरपाई देण्याचे आदेश लिबर्टी जनरल विमा कंपनीला दिले.
या कंपनीने कंपनीने या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले. त्यावर न्यायमूर्ती चांडक यांनी न्यायाधिकरणाचे आदेश कायम ठेवत जखमी अर्जदारास १७ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.