ओतूर, ता. ६ : ओतूर (ता. जुन्नर) येथील पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या नऊ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे ओतूरसह अकोले, संगमनेर आणि चाकण परिसरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.
३१ ऑक्टोबर रोजी रात्री ओतूर येथील चैतन्य विद्यालयासमोरील रस्त्यावरून दत्तात्रेय बाळशिराम गिते यांची डिस्कव्हर मोटारसायकल (एमएच १४ बीएच ६३६७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास करताना ओतूर पोलिसांच्या पथकाला ब्राह्मणवाडा-ओतूर रस्त्यावर संशयित तीन जण चोरीच्या मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संदीप गोरक्षनाथ गडख, वैभव विजय वावळे (दोघेही रा. अकोले परिसर, जि. अहिल्यानगर) आणि दीपक कुमा उंबरे (रा. मांडवे, ता. जुन्नर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोटारसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. तपासात संबंधित मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिघांना अटक केली.
पोलिस कोठडीत अधिक चौकशी केली असता आरोपींनी त्यांचा साथीदार विशाल सुनील ठोंगीरे (रा. मुथाळणे, ता. जुन्नर) याच्या मदतीने आणखी आठ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या मोटारसायकली अकोले, संगमनेर, चाकण आणि ओतूर परिसरातून चोरल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी एकूण नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामध्ये डिस्कव्हर, हिरो स्प्लेंडर आणि स्प्लेंडर प्लस या दुचाकींचा समावेश आहे.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलिस उपनिरीक्षक आमणे, पोलिस हवालदार नरेंद्र गोराणे, दिनेश साबळे, महेंद्र पाटील, बाळशिराम भवारी, धनंजय पालवे, पोलीस कॉन्स्टेबल ज्योतीराम पवार, आशिष जगताप, श्यामसुंदर जायभाये, विशाल गोडसे आणि अतुल भेके यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.