पुणे, ता. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटीमध्ये सुमारे ४० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. परिवहन विभागात गैरव्यवहाराचे गंभीर आरोप असलेल्या विवेक भीमनवार यांना ‘एमपीएससी’च्या अध्यक्षपदी बसवणे हा विद्यार्थ्यांसाठी ‘काळा दिवस’ होता. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही पवार यांनी मंगळवारी पुण्यात केली.
पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्य सरकार आणि ‘एमपीएससी’च्या कारभारावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, ‘‘जानेवारीमध्ये पेपर फुटला होता, हा आयोगाचा दावा दिशाभूल करणारा आहे. प्रत्यक्षात परीक्षेच्या दोन दिवस आधीच पेपर बाहेर आला आणि शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. आता सण-उत्सवांचे कारण देत गट ‘क’ परीक्षा अनेक महिने पुढे ढकलण्यामागे नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. १० बाय १०च्या खोलीत राहून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी हा खेळ आहे.’’
‘१८०० कोटींचा गैरव्यवहार’
‘‘भीमनवार परिवहन आयुक्त असताना जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवण्याच्या नावाखाली १८०० कोटी रुपयांची लूट झाली. तसेच, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे चुकीचे ई-चलन पाठवून जनतेचे सुमारे ४० कोटी रुपये खासगी कंपन्यांच्या घशात घातले गेले. त्यांच्याच कार्यालयावर ‘एसीबी’ची धाड पडली होती. अशा अधिकाऱ्याला एमपीएससीसारख्या घटनात्मक पदावर का बसवले?’’ असा प्रश्न करत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी पवार यांनी केली.
‘‘‘एमपीएससी’ पेपरफुटीप्रकरणी माझ्याविरोधात सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप केले जात आहेत. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या पदभार स्वीकारण्यापूर्वीचा आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच आयोगाने पोलिसांत तक्रार केली असून, तपास सुरू आहे.’’
- विवेक भीमनवार, अध्यक्ष, एमपीएससी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.