साप्ताहिक समालोचन
---------------------
नागपुरात लहान आकाराच्या संत्र्यांची आवक कायम
विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लहान आकाराच्या संत्र्यांची आवक नियमित होत असून, या फळांना अपेक्षेच्या तुलनेत मर्यादित दर मिळत आहेत. तसेच, मागणी वाढल्याने लिंबाच्या दरात सुधारणा झाली आहे. सीताफळासह मोसंबी, डाळिंब, पपई आणि आवळ्याची आवकही लक्षणीय आहे.
अमरावती बाजार समितीत प्रक्रियेसाठी फारसे उपयुक्त न ठरणाऱ्या लहान आकाराच्या संत्र्यांची आवक सध्या १८७ क्विंटलवर पोहोचली आहे. या संत्र्यांना प्रतिक्विंटल २,००० ते ४,००० रुपये दर मिळत आहे. संत्रा उत्पादकांसाठी मोठ्या आकाराच्या फळांना अपेक्षित बाजारभाव मिळणे महत्त्वाचे असताना, लहान आकाराच्या फळांची विक्री मर्यादित दरात करावी लागत आहे.
लिंबाची मागणी वाढल्याने दराला आधार मिळाला आहे. लिंबाची ३८ क्विंटल आवक झाली असून, प्रतिक्विंटल ६,००० ते ७,००० रुपये दराने व्यवहार झाले. फळांच्या बाजारात मोसंबीची सर्वाधिक ३५७ क्विंटल आवक नोंदविण्यात आली. मोसंबीला १,५०० ते ३,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. डाळिंबाची ६८ क्विंटल आवक झाली असून, १२ हजार ते १४ हजार रुपये दराने व्यवहार झाले. तैवान पपईची १४३ क्विंटल आवक झाली. पपईला २,५०० ते ३,००० रुपये दर मिळाला. आवळ्याची १३६ क्विंटल आवक होऊन १,५०० ते ३,००० रुपये दर राहिला. सध्या सीताफळाच्या हंगामाला वेग येत असल्याचे बाजारातील आवकेतून स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्यात अवघी ६०० क्विंटल असलेली सीताफळाची आवक या आठवड्यात वाढून ७८९ क्विंटलवर पोहोचली. सीताफळाला प्रतिक्विंटल २,००० ते ५,००० रुपये दर मिळाला. हिरव्या हरभऱ्याचीही ९५० क्विंटल आवक झाली असून, १,५४० ते २,००० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
-
कांदा, बटाट्याचे दर आवकेनुसार
भाजीपाला बाजारात नाशिक कांद्याची २७३ क्विंटल आवक झाली. कांद्याला ३,५०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची ५५० क्विंटल आवक होऊन ७०० ते १,४०० रुपये दराने व्यवहार झाले. लसणाचे दर मात्र तुलनेने टिकून आहेत. लसणाची ११२ क्विंटल आवक झाली असून, ७,००० ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आल्याची ८३ क्विंटल आवक झाली. त्याला ५,००० ते ७,००० रुपये दर मिळाला. टोमॅटोची २५३ क्विंटल आवक होऊन १,००० ते २,००० रुपये दर राहिला. वांगी १३२ क्विंटल, कारले ६८ क्विंटल, बरबटी ५० क्विंटल आणि ढेमसे ४८ क्विंटल अशी आवक झाली. कारल्याला २,६०० ते ३,२०० रुपये, तर बरबटी आणि ढेमशाला २,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्याचे दर १,२०० ते २,२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. कारल्याची आवक तुलनेने कमी असल्याने दराला आधार मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे.
-
हिरव्या भाजीपाल्याला चांगले दर
हिरव्या भाजीपाल्यात मेथी, पालक आणि कोथिंबिरीचे व्यवहार सुरू आहेत. पालकाला ८०० ते १,४०० रुपये, तर मेथीला १,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोथिंबिरीची १४५ क्विंटल आवक होऊन १,५०० ते २,५०० रुपये दर राहिला. काकडीची ७८ क्विंटल आवक झाली असून, २,००० ते २,५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ११० क्विंटल आवक होऊन ३,२०० ते ४,२०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार झाले. ढोबळी मिरचीची आवक मात्र अवघी नऊ क्विंटल राहिली. तिला २,५०० ते ३,००० रुपये दर मिळाला. भेंडीची ७४ क्विंटल आवक होऊन २,६०० ते ३,२०० रुपये दर मिळाला. गाजराची ५० क्विंटल आवक झाली असून, २,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार झाले.
एकूणच, अमरावतीच्या फळ-भाजीपाला बाजारात हंगामी फळांची आवक वाढत असताना लिंबू, लसूण, हिरवी मिरची आणि कारल्याला तुलनेने चांगले दर मिळत आहेत. आवक, मागणी आणि हंगामी उपलब्धता यांनुसार विविध शेतमालाच्या दरांमध्ये चढ-उतार होत असल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.