चित्रपटसृष्टीतील योगदान अविस्मरणीय
नाना पाटेकर यांचा अभिनयाचा अंदाज, विविध प्रकारच्या भूमिका निभावण्याची क्षमता आणि हिंदी-मराठी चित्रपटांतील त्यांचे योगदान हे कधीही विसरले जाऊ शकत नाही. प्रत्येक भूमिकेत त्यांनी वैविध्य आणि रचनात्मकता दाखवली. अनेक पिढ्यांपर्यंत लक्षात राहतील, अशी पात्रे त्यांनी रंगवली. आपले म्हणणे ठामपणे मांडण्याची धमक त्यांच्या होती. तिरंगा, क्रांतीवीर, प्रहार, परिंदा, खामोशी अशा चित्रपटांतून त्यांनी काम केले. पाटेकर यांचे जीवन तिरंगा ध्वजाच्या सन्मानासाठी समर्पित राहिले. बंधनात राहण्याऐवजी ते ‘परिंदा’ अर्थात पक्ष्याप्रमाणे आकाशात उडत राहिले. समाजातील अव्यवस्थेविरोधात त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून कठोर प्रहार केला. ते असे क्रांतीवीर होते की ज्यांनी वाईट गोष्टींविरोधात काम केले. त्यांची वाणी जितकी प्रखर होती तितकीच त्यांची खामोशी प्रभावी होती. देशविरोधी प्रवृत्तीवर अंकुश लावण्याचे ते समर्थक होते
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
------------
संवेदनशील पर्व संपले
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले. कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शरद पवार, ज्येष्ठ नेते
---------
कलाक्षेत्राचे अतीव नुकसान
गेल्या चार दशकांहून अधिक काळ माझे त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. नानांनी आपले आयुष्य नेहमी आपल्या स्वतःच्या अटींवर आणि तत्त्वांनुसार जगले. आपल्या विचारांशी आणि तत्त्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. खरं तर, आमच्या मैत्रीचे प्रमुख कारण होते त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची असलेली विलक्षण आवड. १९८० आणि १९९० च्या दशकात ते आमच्या वार्षिक ‘गुणीदास संगीत संमेलना’ला आवर्जून उपस्थित राहत असत. एक प्रसंग आजही माझ्या मनात अगदी ताजा आहे. एकदा पुण्यात माझे संगीताचे कार्यक्रमाचे आयोजन होते आणि नाना मला ऐकण्यासाठी आले होते. मात्र, त्या मैफलीनंतरचा क्षण माझ्यासाठी अधिक अविस्मरणीय ठरला. त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबीयांना आग्रहाने आपल्या घरी नेले आणि स्वतः आमच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवले. त्यांच्या या कृतीतून त्यांचा मनमोकळा स्वभाव, आपुलकी, माणुसकी आणि दुसऱ्यांप्रती असलेली प्रेमळ भावना प्रकर्षाने जाणवली. दुसरा एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे माझ्यासोबत आगरतळ्याला त्यांनी केलेला प्रवास. तेथे मला आणि उस्ताद राशिद खान यांना ऐकण्यासाठी ते माझ्यासोबत आले होते. त्या दोन दिवसांच्या सहवासात मला नाना किती साधेपणाने आणि अलिप्तपणे जीवन जगत होते, याची मनापासून जाणीव झाली. नानांच्या निधनाने केवळ चित्रपटसृष्टीचेच नव्हे, तर संपूर्ण कलाक्षेत्राचे आणि आपल्या देशाचे अतीव नुकसान झाले आहे.
पंडित सतीश व्यास. संतूर वादक
-------------
सामाजिक कार्यात अग्रणी
ज्येष्ठ अभिनेते आणि निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ''क्रांतिवीर'' ते ''नटसम्राट'' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे. परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरे आणि त्यांनी सोबत येत ''नाम फाऊंडेशन''ची स्थापना केली आणि शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.