नांदेडमध्ये ८८ टक्के शेतकरी अत्यल्प, अल्पभूधारक
११ व्या कृषी गणनेतील आकडेवारी; अत्यल्प भूधारकांचे प्रमाण ५४ टक्के
कृष्णा जोमेगावकर
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : जिल्ह्यातील शेतीधारणा रचनेत अत्यल्प व अल्पभूधारकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे ११ व्या कृषी गणनेतील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एकूण सात लाख ५४ हजार ५१८ खातेदारांकडे आठ लाख ३६ हजार ५८६ हेक्टर शेती क्षेत्र आहे. यात एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अत्यल्प भूधारकांची संख्या ५४.३० टक्के आहे. एकूण भूधारकांपैकी जवळपास ८८ टक्के शेतकरी अत्यल्प व अल्पभूधारक गटातील आहेत.
अकराव्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात चार लाख नऊ हजार ६२९ खातेदार अत्यल्प भूधारक गटातील आहेत. त्यांच्या ताब्यात दोन लाख १७ हजार ८७ हेक्टर क्षेत्र असून, ते एकूण क्षेत्राच्या २५.९५ टक्के आहे. यावरून जिल्ह्यात शेतीचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन झाल्याचे दिसून येते.
एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या अल्पभूधारकांची संख्या दोन लाख ५५ हजार ६२१ आहे. या गटाचे प्रमाण ३३.८७ टक्के असून, त्यांच्या ताब्यात तीन लाख ५५ हजार १६८ हेक्टर क्षेत्र आहे. हे क्षेत्र जिल्ह्याच्या एकूण शेती क्षेत्राच्या ४२.४५ टक्के आहे. त्यामुळे अल्पभूधारकांकडे सर्वाधिक शेती क्षेत्र असल्याचे चित्र समोर आले आहे.
दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या इतर भूधारकांची संख्या तुलनेने कमी आहे. या गटातील खातेदारांची संख्या ८९ हजार २६८ असून, त्यांचे प्रमाण ११.८३ टक्के आहे. मात्र त्यांच्या ताब्यात दोन लाख ६४ हजार ३३१ हेक्टर क्षेत्र आहे. हे एकूण क्षेत्राच्या ३१.६० टक्के आहे.
शेतीचे तुकडीकरण वाढतेय
जिल्ह्यातील एकूण भूधारकांपैकी जवळपास ८८ टक्के शेतकरी अत्यल्प व अल्पभूधारक गटातील असल्याने शेतीचे तुकडीकरण वाढत असल्याचे स्पष्ट होते. वाढती लोकसंख्या, वारसाहक्काने होणारी विभागणी आणि शेतीचे छोटे होत जाणारे क्षेत्र यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
नांदेड जिल्ह्यातील जमीनधारणा
गट खातेदार संख्या टक्केवारी क्षेत्र (हेक्टर) क्षेत्राचे प्रमाण
अत्यल्प ४,०९,६२९ ५४.३० २,१७,०८७ २५.९५
अल्प २,५५,६२१ ३३.८७ ३,५५,१६८ ४२.४५
इतर ८९,२६८ ११.८३ २,६४,३३१ ३१.६०
एकूण ७,५४,५१८ — ८,३६,५८६ —
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.