सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१६ : पंचवटीतील रामतीर्थ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होत आहे. या सोहळ्यानिमित्ताने गोदावरी नदीची महाआरती होणार असून राष्ट्रपती त्यात सहभागी होतील. त्यामुळे यादिवशी स्वतंत्र दोन आरतींऐवजी एकच आरती करावी, असा प्रस्ताव कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. पण, पुरोहित संघाने आरतीची परंपरा खंडित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे वादावर तोडगा काढण्यासाठी रामतीर्थ सेवा समिती व पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. पण, चर्चेत एकमत होऊ न शकल्याने आरतीचा गुंता कायम आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज कुंभमेळा मंत्री महाजन यांनी सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. मंत्री महाजन यांनी बैठकीत राष्ट्रपती मुर्मू या ध्वजारोहणासह होणाऱ्या गोदावरीच्या महाआरतीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या दिवशी गोदाकिनारी एकच आरती करावी, अशी सूचना त्यांनी केली. यानिमित्ताने नाशिकची प्रतिमा देशभरात योग्य पद्धतीने पोहोचण्यास मदत होईल, असा उद्देश महाजन यांनी बैठकीत व्यक्त केला. परंतु, पुरोहित संघाने या प्रस्तावाला विरोध दर्शविला. त्यामुळे वादंग उभे ठाकले आहे.
कायमस्वरूपी एकच आरती : महाजन
सिंहस्थ ध्वजारोहणानिमित्ताने गोदावरीच्या आरतीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढताना एकच आरती व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. येत्या ३१ तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत एकच आरती होईल. तसेच हाच अजेंडा पुढेही कायम ठेवला जाईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.